राणे काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

उद्योगमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. कॅबिनेट बैठक अर्धी टाकून राणे तडक बाहेर पडलेत. राणे येत्या 2 दिवसांत राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता असून ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपचं राणेंबाबत वेट अँड वॉचची भूमिका स्विकारली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2014, 08:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उद्योगमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. कॅबिनेट बैठक अर्धी टाकून राणे तडक बाहेर पडलेत. राणे येत्या 2 दिवसांत राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता असून ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपचं राणेंबाबत वेट अँड वॉचची भूमिका स्विकारली आहे.
कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय. येत्या 2 दिवसांत राणे निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि पक्ष श्रेष्ठींकडून
दुर्लक्ष केलं जात असल्यानं ते नाराज झालेत. राणेंची ही अस्वस्थता आता कोणतं रूप घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुत्र नीलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर राणेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता. मात्र तो मंजूर झाला नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या कॅबिनेटच्या दोन बैठकांना नारायण राणेंनी दांडी मारली. तर विधान भवनात सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीतून ते उठून निघून गेले. त्यामुळं आक्रमक राणे आता काय राजकीय भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
काँग्रेसमधील नाराजी
- नारायण राणे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ
- कर्तृत्व असूनही संधी मिळत नसल्यानं नाराज
- नारायण राणे लवकरच मोठा निर्णय घेणार ?
- राणे पुन्हा `राजकीय भूकंप` घडवणार ?
- महाराष्ट्राच्या नजरा राणेंकडे
राजकीय कारकीर्दीवर नजर
- 1999 मध्ये राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- जुलै 2005 - राणेंचं शिवसेनेत
बंड आणि काँग्रेस पक्षात प्रवेश
- राणेंना महसूलमंत्रीपद, मुख्यमंत्री
बनवण्याचे आश्वासन
- 2008 मध्ये विलासरावांच्या
राजीनाम्यानंतर राणेंना
CM पदी संधी नाही
- CM अशोक चव्हाणांच्या
निवडीवर टीका केल्यानं
काँग्रेसमधून निलंबित
-2009 लोकसभा निवडणुकीआधी
राणेंचं निलंबन मागे
- 2009 विधानसभा निवडणुकीनंतर
महसूल खातं काढून उद्योग
- 2010 मध्ये अशोक चव्हाणांच्या
राजीनाम्यानंतर राणेंना
पुन्हा डावललं
- 2014लोकसभा पराभवानंतर
निर्णय प्रक्रियेतून डावललं जात
असल्याची भावना
- राणे समर्थकांनाही संधी
नाही
भाजपचे वेट अॅण्ड वॉच
नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ असताना भाजपनं त्यांच्याबाबत वेट अॅण्ड वॉचचं धोरण अवलंबल्याचं समजतंय... काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले राणे काय निर्णय घेतात, याकडे भाजप नेते लक्ष ठेवून आहेत. दिल्लीमध्ये राणेंनी काही भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आक्रमक झाल्यास राणे कार्ड खेळण्याचा काही भाजप नेत्यांचा विचार आहे.मात्र राणेंचा आक्रमकपणा भाजपला पेलेल का, याबाबत साशंकता असल्यामुळे जपून पावलं टाकली जात आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.