देशातून उद्योग बाहेर जाण्यास सरकार जबाबदार- उद्धव

देशातून उद्योग का बाहेर जात आहेत, हे थांबवणं सरकारची जबाबदारी नाही का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 19, 2013, 05:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातून उद्योग का बाहेर जात आहेत, हे थांबवणं सरकारची जबाबदारी नाही का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. असोचेमनं दिल्लीत आयोजित केलेल्या `द व्हिजन ऑफ न्यू व्हायब्रंट इंडिया` या परिषदेत ते बोलत होते. येणारं सरकार हे आपलंच असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या सराकरची प्रीपेड सिस्टिम बंद झालीये, त्यामुळे सर्वजण आता आमच्या नेटवर्कवर येतील असं ते म्हणाले. आपल्या या भाषणात उद्धवनी अनेक विषयांना स्पर्श केला...
दिल्ली-मुंबई कॉरिडोअर कधी
आपण दिल्लीला बरेच दिवसांनी आल्याचं, उद्धव यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिल्ली-मुंबई कॉरिडोरचा उल्लेख केला होता... हाच धागा पकडत या कॉरिडोरवरून आपण दिल्लीला येऊ, असं उद्धव म्हणालेत... अर्थात, दिल्लीला येणार म्हणजे नेमकं काय करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही...
मोदींचा उल्लेख टाळला
दिल्ली दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची काही वेळापूर्वी भेट घेतली. या भेटीचा तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. तत्पुर्वी युवकांशी झालेल्या वार्तालापामध्ये नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी थेट घेण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. त्यांच्या आधीच्या भाषणाचा धागा पकडून मोदी तुम्हाला भरवशाचा चेहरा वाटत नाही का, असा प्रश्न एका तरुणानं केला... त्यावर खूप चेहरे आहेत, राजनाथ सिंग आणि मी बसून नंतर निर्णय घेऊ, इतकंच ते म्हणाले...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.