'मामाच्या गावाला जाऊया'त बच्चेकंपनीची धम्माल!

पंकज छल्लानी निर्मित 'मामाच्या गावाला जाऊया' हा बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त अभिनय असलेला सिनेमा तुमच्या भेटीला आलाय. सिनेमाची कथा थोडक्यात सांगायची झाली तर नंदन देवकर म्हणजेच अभिजीत खांडकेकर आणि त्याचे तीन भाचे यांची ही कथा आहे.

Updated: Nov 21, 2014, 06:56 PM IST
'मामाच्या गावाला जाऊया'त बच्चेकंपनीची धम्माल! title=

 

सिनेमा : मामाच्या गावाला जाऊया
लेखक : दिग्दर्शक - समीर हेमंत जोशी
निर्माता : पंकज छल्लानी
संगीत : प्रशांत पिल्लई, अवधूत गुप्ते
गीतकार : संदीप खेर,  वैभव जोशी, अवधूत गुप्ते
कलाकार : अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे, शुभंकर अत्रे, साहील मालगे, आर्य भरगुडे

कथा 
पंकज छल्लानी निर्मित 'मामाच्या गावाला जाऊया' हा बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त अभिनय असलेला सिनेमा तुमच्या भेटीला आलाय. सिनेमाची कथा थोडक्यात सांगायची झाली तर नंदन देवकर म्हणजेच अभिजीत खांडकेकर आणि त्याचे तीन भाचे यांची ही कथा आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर अनाथ झालेली ही बच्चेकंपनी आपल्या मामाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतात आणि अचानकपणे एका जंगलात हरवून बसतात. नंतर मग या जंगलात काय-काय नाट्य घडतं हे पाहणं मनोरंजक ठरतं. 
 
अभिनय 
मामाच्या गावाला जाऊयामध्ये, अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चिंटू फेम शुभंकर अत्रे, साहील मालगे आणि आर्या भरगुडे या बच्चेकंपनीने सिनेमात धमाल आणलीये. अभिजीत खांडकेकरचा हा खरंतर दुसराच सिनेमा आहे, मात्र पडद्यावरचा त्याचा हा अपिअरन्स चांगलाच भाव खाऊन जातो. गावाकडचा एक देखणा, राकट तरुण रंगवताना सिनेमातले भावूक क्षणही अभिजीतने भूमिकेत शिरून, अत्यंत चपखलपणे रंगवलेत. त्यामुळे सिनेमातले डायलॉग असतील, नृत्य असेल, यामध्ये अभिजीतने खऱ्या अर्थानं जान आणलीय. 
 
दुसरीकडे स्वतःला नेहमी बुद्धीमान आणि तल्लख म्हणवणारा साहिल, फॅशनची आवड असणारी स्मार्ट गर्ल ईरा आणि या दोघांचा मोठा दादा कुणाल... या त्रिकुटानं सिनेमातल्या भूमिका छान एन्जॉय केल्यात.
 
संगीत
सिनेमाच्या संगीताबाबत बोलायचं झालं तर प्रशांत पिल्लई यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. ए. आर. रेहमानबरोबर काम केलेल्या प्रशांत पिल्लईनी, तालबद्ध गाणी दिलीत. 'मामाच्या गावाला जाउया जाउया' या गाण्याप्रमाणेच पण  सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिकही प्रभावी ठरलंय. 
त्यामुळे जंगलातले सिन पडद्यावर पाहताना त्याचा योग्य तो इम्पॅक्ट राखण्यात सिनेमाच्या टीमला यश आलंय. अवधूत गुप्तेचं प्रमोशनल गाणं हा सिनेमाचा आणखी एक प्लस पॉईंट
 
दिग्दर्शन 
सिनेमाच्या दिग्दर्शनाबाबत बोलायचं झालं तर मंगलाष्टकनंतर समीर जोशी यांचा हा दुसरा सिनेमा. सिनेमाची कथा साधी-सोपी सरळ आहे. मात्र, पडद्यावर ती प्रभावीपणे मांडण्यात दिग्दर्शकाला हवं तेवढं यश आलंय असं म्हणता येणार नाही. सिनेमातले काही सिन कमालीचे गुंतागुंतीचे वाटतात. जंगलात हरवलेल्या मुलांना आपला मामा कोण? हे कळल्यानंतरसुद्धा त्यांच्यातला गोंधळ कायम ठेवत, सिनेमा उगाचच लांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. लहान मुलांची कामं उत्तम झालीयेत पण काही सिन्स आणखी उत्स्फूर्त असायला हवे होते.  
 
शेवटी काय तर...  
तर मग हा सिनेमा का बघायचा हा प्रश्नही कदाचित तुम्हाला पडेल... तर तो बघायचा अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या उत्स्फूर्त अभिनयासाठी...त्यांच्यातल्या डायलॉगसाठी  आणि बच्चेकंपनीची दे धम्माल एन्जॉय करण्यासाठी... सो, घरातल्या बच्चेकंपनीला घेऊन एकदा ही फिल्म बघायला हरकत नाही.

आम्ही देतोय या सिनेमाला साडे तीन स्टार... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.