ऐकावं ते नवलंच... शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील एक पोपट भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या मालकानं शेजारच्या वृद्धेला त्रास देण्यासाठी त्याला म्हणे अश्लील शिव्या शिकविल्या आहेत. वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली असून पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं पोपटाला जंगलात सोडण्याची तयारी चालवली आहे. 

Updated: Aug 17, 2015, 08:08 PM IST
ऐकावं ते नवलंच...  शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार title=

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील एक पोपट भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या मालकानं शेजारच्या वृद्धेला त्रास देण्यासाठी त्याला म्हणे अश्लील शिव्या शिकविल्या आहेत. वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली असून पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं पोपटाला जंगलात सोडण्याची तयारी चालवली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात शेजारी राहणारी २ घरं कट्टर वैरी झाली आहेत. खरं तर ही रक्ताची नाती आहेत. मात्र संपत्तीच्या वादामुळं शत्रू झाली आहेत. यापैकी ७० वर्ष वयाची वृद्धा या प्रकरणात पीडित आहे तिही एका पोपटामुळं. या वृद्धेला त्रास देण्यासाठी शेजाऱ्य़ांनी पोपटाला अश्लील शिव्या शिकविल्या, असा महिलेचा आरोप आहे. सुमारे वर्षभर या वृद्धेनं हा त्रास सहन केला. ही वृद्धा घराबाहेर आली की पिंजऱ्यात असलेला पोपट तिला शिव्या घालतो. अखेर त्रस्त झालेल्या वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली आणि पोलीसही चक्रावून गेले. 

या सर्व तक्रारीचा पोपटाच्या मालकानं मात्र इन्कार केलाय. या वृद्धेनं केलेले आरोप धादांत खोटे असून त्याचा सत्याशी संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात वनविभागाची मदत घेतली असून हा गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. वृद्धेच्या तक्रारीवरून हा पोपट वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीस तपासात पोपट शिव्या देत नसल्याचं स्पष्ट झालंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.