पावसाची दांडी; 'पाणी... पाणी' करण्याची वेळ येणार?

राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर  दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय. पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतकऱ्यांवर येणार, अशी चिन्हं दिसतायत.

Updated: Jun 26, 2014, 11:48 AM IST
पावसाची दांडी; 'पाणी... पाणी' करण्याची वेळ येणार? title=
फाईल फोटो

मुंबई : राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर  दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय. पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतकऱ्यांवर येणार, अशी चिन्हं दिसतायत.

पुणेकरांवर कधीही पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापुरातील उजनी धरणंही पार आटलंय. वरुणराजानं पाठ फिरवल्यामुळं मराठवाड्यात पेरण्या रखडल्या आहेत. मराठवाड्यात केवळ 20 टक्के एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जायकवाडीतून 4 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. आधी दुष्काळ, मग गारपीट आणि आता पुन्हा अस्मानी संकट मराठवाड्यावर ओढवलंय.

नाशिकमध्ये 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाअभावी खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर विदर्भात पाऊसच पडलेला नसल्यानं तापमान 39 अंशापर्यंत वाढलंय. शिवाय इथंही दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर कोसळलंय. शरद पवारांनीही राज्यावर दुष्काळाचं सावट असल्याचं सांगितलंय. त्यामुळं निसर्गाच्या अवकृपेवर सरकार काय उपाययोजना करणार? याकडे लक्ष लागलंय. 

राज्यातल्या जवळपास सर्वच शहरात प्रचंड पाणीकपात सुरू आहे. मनमाडसारख्या शहरात तब्बल 25 दिवसांतून एकदा पाणी येतंय. मुंबई पुणेकरांनो पाणी सांभाळून वापरा.. आपल्या राज्यातली इतर शहरं कसं पाणी संकट सोसत आहेत पाहा..

 

मुंबईतही होणार पाणीकपात?

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही पाणीकपात होण्याची शक्यता आहे. 31 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या मुंबईला पुरवठा कऱणाऱ्या धरणात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईत पाऊस झाला नाही तर पाणीकपात करावी लागणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी काल पाणीकपातीचे संकेत दिलेत.

 

पुण्याची धरणंह पडली कोरडी

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त १.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलाय. यातून १५ जुलैपर्यंत पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका आणि जलसंपदा विभागानं केलंय. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैच्या पुढेही टिकवणं गरचेचं बनलंय. पाणीकपातीचे नियोजन करण्यासाठी आज महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पाणीकपात कधी पासून करायची, किती पाणी कपात करायची या संदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.  

पुण्यातील धरणांच्या स्थितीवर एक नजर... 

धरण पाणीसाठा
खडकवासला 00.81 टीएमसी
पानशेत 01.15 टीएमसी
वरसगाव 00.00 टीएमसी
टेमघर 00.00 टीएमसी

  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.