'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!

पुणेकरांना आता महिन्यातून एक दिवस पीएमपीएलने मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महापालिकेनं ही योजना आणली आहे. नागरिकांना पीएमपीएलनं प्रवास करण्याची सवय लागावी. हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या वाढल्यास, रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या देखील कमी होईल, असा विश्वास महापालिकेला वाटतोय. 

Updated: Dec 1, 2016, 08:52 PM IST
'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!  title=

नितीन पाटणकर, पुणे : पुणेकरांना आता महिन्यातून एक दिवस पीएमपीएलने मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महापालिकेनं ही योजना आणली आहे. नागरिकांना पीएमपीएलनं प्रवास करण्याची सवय लागावी. हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या वाढल्यास, रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या देखील कमी होईल, असा विश्वास महापालिकेला वाटतोय. 

पीएमपीएल... पुण्याची एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. या पीएमपीएलनं प्रवाशांना महिन्यातील एक दिवस आता मोफत प्रवास करता येणार आहे. मोफत प्रवासासाठी महिन्यातील अखेरचा सोमवार निवडण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिलीय. आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढं हा प्रस्ताव मंजुरीसाठी जाईल. त्यांनतर डिसेंबरच्या शेवटच्या सोमवार पासून ही योजना प्रत्यक्षात येणं अपेक्षित आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिलीय.

पीएमपीएलने दररोज साधारण दहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून दीड कोटींच्या आसपास उत्पन्न पीएमपीएलला मिळतं. म्हणजे एक दिवस मोफत प्रवासाची सुविधा दिल्यानं पीएमपीएलला तेवढा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळं ही रक्कम पीएमपीएलला अनुदानाच्या स्वरूपात महापालिका देणार आहे. 

तुटलेले दरवाजे आणि खिडक्या... फाटलेले सीट... धूर मारणारी काळवंडलेली बस. पीएमपीएलची ही अवस्था सुधारली आणि कर्मचारी प्रवाशांची सौजन्याने वागले तर पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या निश्चित वाढेल. त्यासाठी अशा मोफत प्रवासाच्या योजनांची गरज नक्कीच पडणार नाही.