22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2017, 11:41 PM IST
22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप title=

रत्नागिरी : कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

रामपूर गावातल्या केदारनाथ देवाच्या सहाणेच्या प्रांगणात रंगणा-या अनोख्या पालखी सोहळ्याची सुरूवात होते आणि रत्नागिरीतल्या शेवटच्या जत्रेची सांगताही याच छबिन्यात होते. पालखी सोहळ्याच्या वेळी रामपूर गावाला दिवाळीचं रुप आलेलं असतं. जसजशी रात्र उलटत जाते तसतसं ढोलताशांच्या गजरात पालख्यांचं आगमन होतं आणि एक एक करत 22 पालख्या एकाच प्रांगणात येतात. रोषणाईने सारेच मार्ग असे सजलेले असतात... 

आपलीच पालखी सगळ्यात आकर्षक असावी यासाठी प्रत्येक गावाची चढाओढ असते. शेकडो ग्रामस्थ ग्रामदेवतेची पालखी नाचवतच आणतात. यात्रेच्यानिमित्तानं गावापासून दूर गेलेला कोकणी माणूसही न चुकता गावात येतो. माहेरवाशिणी देखील पालखी भेटीच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. 

सर्व 22 पालख्या गावाच्या सहाणेच्या बाजूला एकत्र विसवतात. याच दरम्यान केदारनाथाची पालखी सज्ज होऊन बाहेर येते आणि इथंच सुरू होतो डोळ्यांचं पारणं फेडणारा देव भेटीचा अनोखा सोहळा. गावागावातून आलेल्या शेकडो ढोलताशांचा निनाद आणि आपल्या ग्रामदेवतेला डोक्यावर घेवून नाचवत बेधुंद झालेला कोकणी माणूस यामुळे एक अलौकिक वातावरण निर्माण होतं. 

केदारनाथाची ही यात्रा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पालखी भेटीचा रात्री सुरू होणारा जल्लोष अगदी पहाटेपर्यंत सुरू राहतो. गावागावांना, तिथल्या माणसांना जोडण्यासाठी मागील पिढीनं सुरु केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात साजरी होते आणि वर्षानुवर्ष या गावांना त्यातील माणसाना एकत्र बांधून ठेवते.