लातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट'

विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.

Updated: May 25, 2016, 03:56 PM IST
लातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट' title=

मुंबई : विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.

कंपनीला ११ वर्ष पूर्ण 

यासाठी स्पाईसजेटनं 'एनीबडी कॅन हेल्प' या एनजीओसोबत हातमिळवणी केलीय. याबद्दल एअरलाईननं एक पत्रक जाहीर करून माहिती दिलीय. लवकरच, कंपनीच्या स्थापनेला ११ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याच निमित्तानं कंपनीनं हे कार्य हाती घेतलंय.

एक महिनाभर चालणार योजना

याद्वारे दररोज टँकरच्या साहाय्यानं ११ गावांना ७१,५०० लीटर पाणी पुरवलं जाणार आहे. २३ मेपासून याची सुरुवात होणार आहे. पुढचा एक महिना ही योजना सुरू राहील. 

उरलाय केवळ १ टक्का जलसाठा

महाराष्ट्र सरकारनं या महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास २९,००० गावं दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलीत. यामध्ये, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागात केवळ एक टक्के जलसाठी उरलाय.