'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

Updated: Jan 14, 2015, 11:47 AM IST
'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी! title=

मुंबई : मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

१९ मार्च २००६ चा तो दिवस....... महाराष्ट्राला नवनिर्माणाचं स्वप्न दाखवत एका नव्या राजकीय पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली... व्यासपीठावर राज ठाकरेंबरोबर त्यांचे विश्वासू साथीदार वसंत गिते आणि प्रवीण दरेकर... एक कट्टर समर्थक... दुसरा प्रचंड विश्वासू... राज ठाकरेंच्या करिष्म्यावर शिवसेनेतून बंडखोरी करत शेकडो मावळे बरोबर आले... आजच्या घडीला मनसेचं वय बरोबर आठ वर्षं १० महिने पूर्ण... पण या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय.

मनसेला पहिला धक्का पक्ष स्थापन होताच बसला तो राजा चौगुलेंच्या रुपानं... नाराजीमुळे चौगुलेंनी शिवसेनेची वाट धरली. नंतर ते परत आले पण पक्ष स्थापन होताच पडलेला तो पहिला मिठाचा खडा... त्यापाठोपाठ २००९ विधानसभा निवडणुकीच्या आधी सरचिटणीस दिगंबर कांडरकर, राज ठाकरेंच्या निकटवर्तीय श्वेता परुळकर आणि विभाग संघटक प्रकाश महाजनांनी मनसेला जय महाराष्ट्र केला.

२००७ च्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी हाती घेतलेला विकासाचा मुद्दा लोकांना फारसा भावला नाही....आणि महापालिकेत अवघे ७ नगरसेवक निवडून आले.... पण २००७ साली पहिल्यांदाच राज आणि राणेंशिवाय शिवसेना पहिल्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरी गेली... रडतकुढत का होईना शिवसेना-भाजपची त्यावेळी सत्ता आली. या पराभवातून मनसेनं धडा घेतला आणि २००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं... ते नाणं खणखणीत निघालं... आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. त्याचा पुढचा अध्याय २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले... मुंबईत तर सहा जागा मिळवत शिवसेनेला तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही. तेव्हापासून राज ठाकरे राजकारणाच्या बाजारातलं चलनी नाणं झालं... २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले... २०१२ च्या मुंबई महापालिकेत मनसेचे २७ नगरसेवक वाजत-गाजत दाखल झाले... नाशिकमध्ये सत्ता आली.... खऱ्या अर्थानं २००९ ते २०१२ हा मनसेचा सुवर्णकाळ ठरला. पण पुढच्या दोन वर्षांत पक्षाच्या कुरबुरी वाढायला लागल्या. २०१४ च्या मोदी लाटेत तर मनसेचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला... घर फिरलं की घराचे वासेही फिरतात... दिवसेंदिवस पक्षातल्या राजीनाम्यांची संख्या वाढत गेली... खरं तर राज ठाकरे यांचं परसेप्शन आणि टायमिंग उत्तम समजलं जातं.... पण २०१४ मध्ये त्या निकषांवरही मनसे तगली नाही.

आता २०१५ च्या सुरुवातीलाच वसंत गिते आणि प्रवीण दरेकरांच्या रुपानं पक्षाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेत असतानाही वसंत गिते आणि प्रवीण दरेकरांची राज ठाकरेंचे कट्टर समर्थक अशीच ओळख.... पण आज तेच कट्टर नेते मनसे अध्यक्षांसोबत नाहीत... भविष्यात डोकावून पाहिलं, तर मनसेसाठी वाटचाल सोपी नाही. गेल्या आठ वर्षांत आंगाखांद्यावर वाढवलेल्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. सध्या तरी या सगळ्या घडामोडींवर राज ठाकरे मौन बाळगून आहेत.... राजकारणात पेशन्स लागतो हे खरं असलं तरी पण हा पॉझ मोठा झाला, तर कार्यकर्ते अधिक अस्वस्थ होतील. पक्षावर निष्ठा ठेवण्याचे दिवस गेले... आता कार्यकर्त्यांनाही फास्ट फूड लागतं... त्याशिवाय नुकतेच भाजपवासी झालेल्या नेत्यांना त्यांची संस्थानं टिकवायची आहेत....तेही कार्यकर्त्यांना गळाला लावणार, यात शंका नाही.. त्यातच भाजपला मोदी लाटेचा पुरेपूर फायदा घ्यायचाय, त्यामुळे भाजपही महापालिकेच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न करणारच.... मनसेसमोर आव्हानांचा डोंगर आहे.... आणि इथेच राज यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे..... राजकीय पक्ष म्हटला की इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच असतं.... पण पक्षातले हुकमाचे एक्केच हाती राहिले नाहीत, तर दुर्री, तिर्रीवर डाव जिंकणं सोपं नसतं..... मनसेच्या या आठ वर्षांच्या वाटचालीचा हिशोब करताना एक वर्तुळ पूर्ण होतंय..... मनसेची स्थापना ही बंडखोरीतूनच झाली..... आज मनसेतल्याच शिलेदारांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षाची वाट धरलीय... इतिहासाची पुनरावृत्ती होते, ते कदाचित हेच असावं.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.