मुंबईचे तीन आरोग्य रक्षक

 स्कूबा डायव्हींग म्हटलं की आपल्याला आठवतं ते समुद्राखालचं विश्व पाहण्यासाठी केला जाणारा थरार. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2017, 11:26 PM IST
मुंबईचे तीन आरोग्य रक्षक title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : स्कूबा डायव्हींग म्हटलं की आपल्याला आठवतं ते समुद्राखालचं विश्व पाहण्यासाठी केला जाणारा थरार. त्यासाठी हजारो रूपयेही मोजायची अनेकांची तयारी असते. पण मुंबईत असे काही स्कूबा डायव्हर्स आहेत जे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतात.

हे आहेत चंद्रकांत तांडेल,  नेव्ही मधून तांडेल यांनी स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मलनिःसारण खात्यात ते स्कुबा डायव्हर म्हणून कामाला आहेत. हे ऐकून धक्का बसला असेल पण हे खरं आहे.

मुंबई महानगरपालिकेतील मलनिःसारण खात्यात एकूण ३ स्कुबा डायव्हर आहेत. खात्याअंतर्गत वाहणाऱ्या मल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आपली सेवा देत आहेत. मलजल वाहिनी तुंबली असता  त्या घाणेरड्या पाण्यात उतरून सुमारे १८० फुटापर्यंत आत जाऊन वाहिनी साफ करतात.

मुंबई महानगरपालिकेकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे मात्र कधी कधी यंत्राचा उपयोग होत नाही तेथे हे स्कुबा डायव्हर आपली सेवा देत मुंबई स्वच्छ करण्यास मदत करतात 

कुलाबा ते मुलुंड आणि दहिसरपर्यंत या स्कूबा डायव्हर्सशी खात्याअंतर्गत बोलावण्यात येते.   मुंबई महानगरपालिकेतर्फे लातूर इथे ही या स्कुबा डायव्हरनी सेवा दिली आहे.  लातूरकरांची मलनिःसारण वाहिनी दुरुस्त करून दिली. मुंबई महापालिका या स्कुबा डायव्हरना महिना फक्त ६०० रुपये जास्तीचा भत्ता देत आहे. तरीही हे कर्मचारी खुश आहेत. 

रस्त्यावरून सांड पाणी वाहत असेल तर आपण नाकाला हात लावून बाजूने जातो , तर दुसरीकडे त्याच घाणेरड्या पाण्यात पूर्ण आत जाऊन मलवाहिनी स्वच्छ करण्याचं धैर्याचं काम हे स्कूबा डायव्हर्स करतात.  मुंबईची सेवा करायची हीच इच्छा या कर्मचाऱयांची आहे. मुंबईला स्वच्छ ठेवण्यास मदत करणाऱ्या या स्कुबा डायव्हर्सना सलाम.