शिवसेनेला गृहराज्य मंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदल

राज्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ करण्यात येणार असून शिवसेनेला एक गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदलही करण्यात येणार आहे.

Updated: Jul 8, 2016, 12:10 AM IST
शिवसेनेला गृहराज्य मंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदल title=

मुंबई : राज्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ करण्यात येणार असून शिवसेनेला एक गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. याबाबत शिवसेना-भाजपने संयुक्तिक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदलही करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ८ जुलैला होत आहे. सकाळी ९ वाजता विधानभवन येथे हा विस्तार होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या उद्याच्या विस्तारात दोनापैकी एक गृह राज्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेनं एका अतिरिक्त कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र गृहराज्यमंत्री पद देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची बोळवण केल्याचं स्पष्ट झालंय.

उद्याच्या विस्तारात भाजपाचे 6, भाजपाच्या मित्रपक्षांचे दोन तर शिवसेनेचे दोनजण मंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील-निलंगेकर, मदन येरावार आणि रवींद्र चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागलीये. तर महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत हेदेखील उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा पट्टा मात्र कापण्यात आलाय. शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद दिल्यामुळं त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे.

सुरूवातीला आघाडीवर नाव असलेल्या शिवाजीराव नाईक यांचं नाव मागं पडलं असून त्यांच्याऐवजी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली आहे.. शिवसेनेचे जळगावचे आमदार गुलाबराव पाटील आणि जालन्याचे अर्जून खोतकर उद्या राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पहिल्या टप्प्यात मंत्रिपदांसाठी मुंबईचा वरचष्मा होता. ग्रामीण भागाला पुरेसं प्रतिनिधीत्व देण्यात आलेलं नव्हतं. यानिमित्तानं खान्देश आणि मराठवाड्याला संधी देऊन उद्धव ठाकरेंनी ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.  

शिवसेनेला वारंवार डिवचणा-या खडसेंना वेळोवेळी अंगावर घेतल्यामुळंच गुलाबराव पाटलांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाल्याची चर्चा आहे. नेहमी राजभवनात होणारा शपथविधीचा कार्यक्रम यंदा विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.  दरम्यान भाजपचे होणारे मंत्री मित्रपक्षातले महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत तसंच शिवसेनेचे अर्जुन खोतकर सध्या वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. मंत्री झाल्यावर भविष्यातील वाटचालीबाबत मुख्यमंत्री त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

असा असणार खांदेपालट

-  राम शिंदे यांना कृषी खाते

 पांडुरंग फुंडकर यांच्याकडे सहकार खाते

-  चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल आणि पीडब्ल्यूडी

-  गिरीश महाजन यांच्याकडे उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा खाते

-  विनोद तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते काढून घेतले जाणार आहे.

-  सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्राकांत बावनकुळे यांच्या खात्यात बदल होणार नाही.