मुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना

शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.

Updated: Apr 5, 2016, 01:07 PM IST
 मुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना title=

मुंबई  : शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.

सामनामध्ये म्हटलंय....

फडणवीस यांनी हे आधी जोरात सांगितले आणि नंतर ‘भारतमाता की जय‘च्या प्रश्‍नी ते नरम पडले. फडणवीस यांनी माघार घेण्याची गरज नव्हती, पण त्यांनी माघार घेतली आणि त्याचे खापर नेहमीप्रमाणे मीडियावर फोडले. हे असे का झाले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करायला हवा. मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच ठरते, पण ते आधी कठोर झाले आणि नंतर जास्त पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले.

शिवसेनेने सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून आपले मत मांडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे 

सामनामध्ये लिहिलंय...

की जे भारतमाता की जय बोलणार नाहीत, त्यांना महाराष्ट्रात व देशात राहाण्याचा अधिकार नाही! भारतमातेचा अपमान करणार्‍या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा. अशी गर्जना करून आम्ही काही गुन्हा केला असेल तर मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ओवेसी सुटला तरी चालेल, पण देशप्रेमी तुरुंगात गेलेच पाहिजेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पद्धतीने सांगितले की, 'भारतमाता की जय बोलावेच लागेल. जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना हिंदुस्थानात राहाण्याचा अधिकार नाही!' सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीही आधी सगळ्यांना भारतमाता की जय बोलावेच लागेल, भारतमाता की जयचा नारा जगभरात घुमवू असे बजावले; पण लगेच सरसंघचालकही नरम पडले! अशी सक्ती करून कसे चालेल? अशी भूमिका त्यांनी घेतली. 

या बदललेल्या भूमिका आश्‍चर्यकारक, तितक्याच धक्कादायक आहेत. दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटा व हे सर्व 'राष्ट्रीय' उपक्रम मार्गी लावा! देशविरोधी फतवा काढणार्‍या देवबंदवाल्यांचे नरडे दाबा. भारतमातेचा अपमान करणार्‍या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा आणि जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबाबाईंना एकदा तरी भारतमाता की जय बोलायला लावा! वाटल्यास हे सर्व करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अणे वकिलांची नेमणूक करावी! बोला, भारतमाता की जय!