वीज दुरूस्तीचा भार आता महिलांवर

गावातली वीज गेली आणि दुरूस्तीसाठी वीज कंपनीने एखाद्या महिलेला पाठवले तर `शॉक` लागण्याचं काही कारण नाही. यापुढे वीज दुरूस्तीचा भार केवळ वायरमनच नव्हे, तर वायरवुमनही वाहणार आहेत. महावितरणनं राज्यात 2 हजार वायरवुमनची भरती केली असून त्यांना सध्या नाशिकच्या एकलहरे केंद्रात प्रशिक्षण दिलं जातंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2013, 04:54 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
गावातली वीज गेली आणि दुरूस्तीसाठी वीज कंपनीने एखाद्या महिलेला पाठवले तर `शॉक` लागण्याचं काही कारण नाही. यापुढे वीज दुरूस्तीचा भार केवळ वायरमनच नव्हे, तर वायरवुमनही वाहणार आहेत. महावितरणनं राज्यात 2 हजार वायरवुमनची भरती केली असून त्यांना सध्या नाशिकच्या एकलहरे केंद्रात प्रशिक्षण दिलं जातंय.

विजेच्या खांबांवर आता महिला सर सर चढणार आहेत. पोलवरील विजेच्या तारा निट करणं, खंडित वीज प्रवाह पुन्हा सुरू करणं, अशी कामं याआधी केवळ पुरूष वायरमन करायचे. पण आता वायरवुमनही त्यासाठी सज्ज आहेत. सबस्टेशनमधील ट्रांसफॉर्मर असो की आयसोलेटर, अगदी ब्रेकर सुरळीत करून डीपीवरील संयंत्र दुरुस्त करण्याचं अवघड कामंही या मुली आता आपल्या खांद्यावर पेलणार आहेत.
सर्वात अवघड आणि रिस्की काम म्हणून आजपर्यंत या कामाकडं बघितलं जायचं. चूक झाली तर जीवच जाणार. तरीही मोठ्या उत्साहाने या मुली या कामाचं प्रशिक्षण घेत आहेत. पुरूषांपेक्षा आम्ही कुठंही कमी नाही हेच दाखवून देण्यासाठी त्या सज्ज आहेत. केवळ नाशिक विभागातच नव्हे, तर राज्यात सर्वत्र वायरवुमनच्या नियुक्त्या होणार आहेत. आठ हजार वायरमनच्या भरतीपैकी जवळपास दोन हजार वायरवूमन निवडण्यात आल्यात.
राज्यातील चार प्रशिक्षण केंद्रांमध्ये या मुलीचं ट्रेनिंग सुरु असून त्यांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारीची जाणिव करून दिली जातेय. गेल्या तीन महिन्यापासून दामिनी पथकात काम करत त्यांनी महावितरणसाठी कोट्यावधी रुपयांची वसुलीही करून दिलीय.
एसटी महामंडळात महिला चालक वाहक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालंय. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांनी हे शिखरही सर केल्यानं ख-या अर्थानं हे बाईचं काम नाही ही म्हण त्यांनी खोटी ठरविलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ