लग्नाच्या नावाखाली तरूणींना कोट्यवधींचा गंडा

पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणा-या युवकाने तीन मुलींना कोट्यवधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2012, 11:10 AM IST

www.24taas.com,पुणे
पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणा-या युवकाने तीन मुलींना कोट्यवधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.
किरण देशपांडे ३२ हा वर्षाचा आहे. संगणक अभियंता असणारा किरण सध्या कोथरुड पोलीस ठाण्यात पोलिसांचा पाहुणचार घेतोय. एखाद्या सिनेमाला साजेसं हा प्रकार घडला. एका बहुराष्ट्रीय बँकेत त्याचं खातं होतं. किरणचं बँकेत काम करणा-या एका तरुणीशी त्यानं ओळख वाढवली. पुढं या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमप्रकरणानंतर लग्न करत एकत्र जगण्याच्या आणाभाका दोघांनी घेतल्या. किरणनं वेगवेगळी कारणं देत या तरुणीकडून पैसे घेतले.
तब्बल सव्वा कोटी रुपये त्यानं त्या तरुणीकडून उकळले. त्यामुळं सिनेमात ट्विस्ट यावा त्याप्रमाणं घडलं. वर्ष उलटली, दोन वर्ष उलटली तरी किरण काही लग्नाला तयार नव्हता. ना पैसे परत द्यायला. त्यामुळं तरुणीनं थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी किरणला अटक केली.
किरण संगणक अभियंता आहे तर फसवणूक झालेल्या तरुणीसुद्धा उच्चशिक्षित आहेत. त्यामुळं त्याच्या भूलथापा आणि खोट्या आश्वासनांना त्या कशा भुलल्या असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय.