राज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार

नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 20, 2013, 06:03 PM IST

www.24taas.com, सातारा
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.
सातारा येथील विश्रामगृहात पवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, मनसेच्या हातात सत्ता असलेल्या नाशिकची दुरवस्था पाहवत नाही. एका वर्षात या शहराची वाट लागली आहे. केवळ नकला केल्याने प्रश्न सुटत नाहीत, हे त्यांना समजत नाही. युतीच्या हातात सत्ता होती, तेव्हा त्यांनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले हे राज ठाकरे यांनी सांगावे.
राज, बाळासाहेबांच्या सभांना गर्दी, पण मते नाही!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं अशी टीका सोलापुरात त्यावर अजित पवारांनी केली होती.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात कोल्हापूर येथे सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. आपल्याला शेतीतील अक्कल शिकवू नये, असंही राज ठाकरे अजित पवारांना म्हणत होते. त्यांच्या नकलेवरून जेव्हा अजित पवारांनी टीका केली तेव्हा, आपल्या दुसऱ्या सभेत नक्कल करायलाही अक्कल लागते, असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं.
यावर रविवारी सोलापूर येथे सभेत बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंचा दौरा भंपक असल्याची टीका केली
सभेला गर्दी झाली, तरी त्याचं रुपांतर मतांमध्ये कधीच होत नसतं, असंअजित पवार म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनाही प्रचंड गर्दी असायची. पण त्यांना कधी सत्ता मिळाली नाही. १९९५ साली त्यांना मिळालेली सत्ता हा एक अपघात होता. त्यासाठी त्यांना बंडखोरांचाच पाठिंबा घ्यावा लागला होता. असं अजित पवारांनी म्हटलं. आपल्या भाषणातून अजितदादांनी शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांना टोला हाणला.