सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Updated: Jul 21, 2014, 04:33 PM IST
सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत title=

नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

क्रिकेटमधील मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांना २०१२ मध्ये राज्यसभेत खासदारकी देण्यात आली. क्रिकेटच्या मैदानातून थेट संसदेच्या मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकरकडून सर्वांनाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा होती. क्रीडा क्षेत्रातील समस्या सचिन राज्यसभेत मांडेल अशी भाबडी आशा क्रीडाप्रेमींना होती. 

गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर सचिन राज्यसभेत वेळ देईल असं वाटत होतं. मात्र याबाबतीत सचिननं क्रीडाप्रेमींना निराश केल्याचं दिसतं. गेल्या दोन वर्षात सचिन फक्त तीन वेळाच राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाला होता. गेल्या वर्षी सचिननं क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यापासून राज्यसभेची तीन अधिवेशनं झाली. यात एकूण ३५ दिवस संसदेचं कामकाज पार पडलं. यात फक्त एकाच दिवशी सचिन राज्यसभेत हजर होता. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सचिन एकदाही राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झालेला नाही. 

सचिनप्रमाणेच अभिनेत्री रेखा यांचाही राज्यसभेतील रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्या आत्तापर्यंत फक्त सात वेळाच राज्यसभेच्या कामकाजात उपस्थित होत्या. या दोघांपेक्षा गीतकार जावेद अख्तर यांचा राज्यसभेतील रेकॉर्ड चांगला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.