अभिमानास्पद! नाचणी विकून हॉकी स्टीक खरेदी करणारी पुंडी अमेरिकावारीसाठी सज्ज

खेळाप्रती असणारी तिची जिद्द आणि चिकाटी परिस्थितीवरही मात करुन गेली. 

Updated: Feb 17, 2020, 12:20 PM IST
अभिमानास्पद! नाचणी विकून हॉकी स्टीक खरेदी करणारी पुंडी अमेरिकावारीसाठी सज्ज   title=
पुंडी सारु

रांची : एखाद्या गोष्टीप्रती जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पक वृत्तीने काम करता, तेव्हा तुमच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आणि याच समर्पक वृत्तीवर यशप्राप्तीची संधीही तुम्हाला मिळते. अनेकदा याचा प्रत्यय काही यशोगाथांच्या माध्यमातून आला आहे. सध्याही क्रीडा जगतात परिस्थिती आणि हतबलतेवर मात करणाऱ्या अशाच एका खेळाडूची संघर्षगाथा तिला प्रकाझोतात आणत आहे. 

मुळची झारखंडमधील एका नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या खुंटी जिल्ह्यातील हेसल या गावातील ही खेळाडू. जी आता येत्या काळात सातासमुद्रापार जाण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने जे स्वप्न बाळगलं होतं, त्या स्वप्नाला आता पंख लागले आहेत. कारण, ती हेसल या लहानशा गावातून थेट अमेरिकेला जाण्यास सज्ज झाली आहे. पुंडी सारू असं या खेळाडूचं नाव. पाच भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पुंडीच्या मोठ्या भावाने बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुंडी स्वत: नववीत आहे. तर, तिच्या एका बहिणीने परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. पुंडीच्या मनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला होता. 

पुरती तुटलेली पुंडी त्या काळात हॉकी या तिच्या सर्वाधिक आवडीच्या खेळापासून दूर राहीली. पण, हा खेळ मात्र ती विसरली नव्हती. सध्याच्या घडीला घरातच असणारे पुंडीचे बाबा हे पूर्वी रोजंदारी भत्त्यावर मजुरीची करायचे. कामावर जाण्यासाठी ते सायकलचा वापर करायचे. पण, एका अपघातात त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली. प्लॅस्टरच्या सहाय्याने त्यांचा हात जोडलाही गेला पण, त्यांचं मजुरीचं काम मात्र बंद झालं. 

जवळपास तीन वर्षांपूर्वी जेव्हा (pundi saru) तिने या खेळात नावलौकिक मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, तेव्हा तिच्याकडे हॉकी हा खेळ खेळण्यासाठी हॉकी स्टीकही नव्हती. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तिने याबाबती माहिती दिली. 'हॉकी स्टीकसाठी घरी पैसे नसल्यामुळे मग मी तेव्हा नाचणी विकली. ज्यामध्ये शिष्य़वृत्ती म्हणून मिळालेले १५०० रुपये जोडले आणि कुठे जाऊन एक हॉकी स्टीक खरेदी केली', असं पुंडी म्हणाली. 

सध्याच्या घडीला पुंडीचे वडील जनावरांना चारा चारण्याचं काम करतात. तर आई घरकामं करते. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेती, जनावरांचं पोषण आणि त्यांची खरेदी यावरच अवलंबून आहे. परिस्थिती प्रत्येक वळणावर आपल्या सहनशीलतेची परिसीमा पाहत असली तरीही पुंडीच्या आत्मविश्वासापुढे मात्र ही आव्हानंही फिकी प़डली. 

...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

गेल्या तीन वर्षांपासून ती स्वत:च्या गावाहून दररोज आठ किलोमीटर इतकं अंतर सर करत खुंटी या गावाहून बिरसा मैदनात जाते. हॉकी स्टीक खरेदी करण्यापासून ते मैदानात हॉकी खेळण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता असं म्हणणाऱ्या पुंडीचं अमेरिकेला जाण्याचंच लक्ष्य नाही. तर तिला भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू निकी प्रधान हिच्याप्रमाणे एक यशस्वी खेळाडू होऊन देशासाठी आपल्या खेळाने किमया करण्याची इच्छा आहे. 

रांची, खुंटी, लोहारदगा, गुमला आणि सिमडेगा अशा भागांतून १०७ मुलींना रांचीच्या 'हॉकी कम ली़डरशिप कॅम्प'मध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. कोलकाता (युएस कॉन्सोलेट) आणि शक्तिवाहिनी या स्वयंसेवी संस्थेकडून या प्रशिक्षणाचं आयोजिन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सात दिवसांच्या शिबीरामध्ये एकूण पाच मुलींचं अमेरिकेला (प्रशिक्षणासाठी) जाण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये पुंडीच्याही नावाचा समावेश आहे.