भारत Vs वेस्ट इंडिज : 'विराट' सेना विंडीजला धूळ चारणार?

राट कोहलीच्या विक्रमाची उत्सुकता ही क्रिकेटप्रेमींना अधिक

Updated: Oct 24, 2018, 10:19 AM IST
भारत Vs वेस्ट इंडिज : 'विराट' सेना विंडीजला धूळ चारणार? title=

मुंबई : भारत आणि विंडीजमधील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमध्ये रंगणार आहे. भारताचं पारडं या सामन्यातही निश्चितच जड आहे. शिवाय या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय. 

गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात क्रिकेट चाहत्यांनी 'द' विराट कोहली आणि रोहित शर्मा शो पाहिला... गुवाहाटीच्या मैदानावर रोहित आणि विराट नावाचं वादळ चांगलचं घोंगावलं. कॅरेबियन गोलंदाज गोलंदाजी करत होते... आणि चेंडू सीमापार जाताना पाहण्यावाचून विंडीज क्षेत्ररक्षकांसमोर पर्याय नव्हता. आता विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्यातही या दोघांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीला या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचीही नामी संधी आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला आणखी ८१ धावांची आवश्यकता आहे. यासह कोहली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जलद १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही मोडित काढणार आहे. सचिननं २५९ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर विराटला २०५ डावांमध्ये दहा हजारी मनसबदार होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे. 

भारतीय गोलंदाजांना गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे गोलंदाजीत कमालीची सुधारणा भारतीय संघाला करावी लागेल. कॅरेबियन संघाची फलंदाजी चांगली झाली होती. त्यांच्या गोलंदाजांच्या पदरीही निराशाच पडली होती.  दरम्यान, भारतीय संघ २०१९ विश्वचषकाच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे मधल्या फळीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.

टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विजय मिळवेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीच्या विक्रमाची उत्सुकता ही क्रिकेटप्रेमींना अधिक असणार आहे.