त्या २ बॉलमुळे झाला मुंबईचा पराभव!

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १४ रननी विजय झाला आहे.

Updated: May 2, 2018, 09:05 PM IST
त्या २ बॉलमुळे झाला मुंबईचा पराभव! title=

बंगळुरू : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १४ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच बंगळुरूनं प्ले ऑफला क्वालिफाय होण्याचं आव्हान कायम ठेवलं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या मात्र प्ले ऑफला क्वालिफाय व्हायची आशा आता धुसर झाली आहे. बंगळुरूनं ठेवलेल्या १६८ रनचा पाठलाग करताना मुंबईनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १५३ रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक ५० रन केल्या. बंगळुरूनं ठेवलेल्या १६८ रनचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला ईशान किशन पहिल्याच बॉलला आऊट झाला. तर रोहित शर्मालाही त्याचं खातं उघडता आलं नाही. रोहितही पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला. बंगळुरूच्या साऊदी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय मुंबईच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि बंगळुरुला धक्के दिले. बंगळुरुचा ओपनर मनन व्होरानं सर्वाधिक ४५ रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मॅकलेनघन, बुमराह आणि मार्कंडेला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

त्या २ बॉलमुळे झाला मुंबईचा पराभव

या मॅचमध्ये झालेला मुंबईचा पराभव हा फक्त २ बॉलमुळे झाला असंच म्हणावं लागेल. या दोन बॉलमध्ये चेन्नईनं तब्बल २६ रन केल्या. १०व्या ओव्हरचा दुसरा बॉल हार्दिक पांड्यानं ब्रॅण्डन मॅक्कलमला टाकला. मॅक्कलमनं या बॉलला सिक्स मारली. हा बॉल मॅक्कलमच्या कंबरेच्या वरती असल्यामुळे अंपायरनं नो बॉल दिला. पुढचा बॉल फ्री हिट असल्यामुळे मॅक्कलमनं या बॉललाही सिक्स मारली. त्यामुळे या ओव्हरच्या एकाच बॉलला १३ रन आल्या.

अशाच प्रकारे २०व्या ओव्हरलाही बंगळुरूनं एकाच बॉलला १३ रन काढल्या. मुंबईची बॉलिंग सुरु असताना मिचेल मॅकलेनघन शेवटची ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला स्कोअर होता १५४ रन. बंगळुरूच्या कॉलिन डि ग्रॅण्डहोमच्या कंबरेवर मॅकलेनघननं बॉल टाकला. या बॉलला ग्रॅण्डहोमनं सिक्स लगावली आणि अंपायरनं पुन्हा एकदा फ्री हिट दिला. पुढच्या बॉलवर ग्रॅण्डहोमनं पुन्हा एकदा सिक्स मारली. अशाप्रकारे फक्त २ बॉलमध्येच मुंबईनं २६ रन दिले आणि त्यांचा १४ रननी पराभव झाला.

मुंबई प्ले ऑफच्या बाहेर?

या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे आयपीएलच्या प्ले ऑफला क्वालिफाय होणं मुंबईला आणखी कठीण होऊन बसलं आहे. मुंबईनं खेळलेल्या ८ पैकी २ मॅचमध्ये विजय आणि ६ मॅचमध्ये पराभव झाला आहे. उरलेल्या ६ पैकी ६ मॅच जिंकल्या आणि इतर टीमच्या कामगिरीवरच मुंबईला प्ले ऑफला क्वालिफाय होणं आता शक्य होणार आहे.