बांगलादेशात रसायनाच्या गोदामाला आग, ४५ जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

Updated: Feb 21, 2019, 09:08 AM IST
बांगलादेशात रसायनाच्या गोदामाला आग, ४५ जणांचा मृत्यू  title=

ढाका : बांग्लादेशात रसायनाच्या गोदामाला आग लागली असून त्यात ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अजूनही शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढाक्याचा जुना भाग असलेला चौकबाजारमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ती आग वाढत जाऊन रसायन असलेल्या गोदामापर्यंत पसरत गेली. आग पसरताच परिसरात प्रचंड गर्दी झाली त्यामुळे माणसांना वाचवण्यात अडचणी आल्या. रस्ते देखील अरुंद असल्यानं बचावकार्यात अडथळे आले.

गर्दीचं ठिकाण असलेल्या ठिकाणी ही आग लागली आहे. बुधवारी रात्री जवळपास १०. ४० मिनिटांनी ही आग लागली आणि झपाट्याने पसरली. गुरुवारी सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आलं नव्हतं. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग केमिकल कंटेनरपर्यंत पोहोचल्याने आगीने रौद्र रुप धारण केलं. या इमारतीत काही लोकं राहत देखील होते.

अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २० जणांचे मृतदेह मिळाले असून इतर मृतदेह काढण्याचं काम सुरु आहे. आग विझल्यानंतर येथे सर्च ऑपरेशन सुरु केलं जाणार आहे. गाड्यांच्या पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत. याआधी २०१० मध्ये देखील ढाका येथे मोठी आग लागली होती. ज्यामध्ये १२० लोकांचा मृत्यू झाला होता.