कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ऋषी कपूर यांचा मोदींना सल्ला....

भारतात सध्याच्या घडीला.... 

Updated: May 28, 2019, 10:29 AM IST
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ऋषी कपूर यांचा मोदींना सल्ला....  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाच्या बळावर भाजपाने लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केलं. या यशानंतर अनेकांनीच मोदींसह इतर नेतेमंडळींना भेच्छा दिल्या. तर, काहींनी त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा त्यांच्याचपुढे मांडल्या. काहींनी मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला काही सल्ले दिले. अभिनेते ऋषी कपूर यांचाही यात समावेश आहे. परदेशात कॅन्सरवर उपचार घेत असणाऱ्या ऋषी कपूर यांनी देशाप्रती असणाऱी आपली जबाबदारी जाणत मोदींना काही सल्ले दिले आहेत. 

रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांवर लक्ष देण्याचा आग्रह कपूर यांनी केला आहे. न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी असणाऱ्या कपूर यांनी ट्विटरच्या माध्यामातून नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि स्मती इराणी यांचं अभिनंदन करत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. 'पुनर्निवाचित भाजपा, नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि स्मृती इराणी यांचं मी अभिनंदन करतो आणि विनंती करतो की, भारतात सध्याच्या घडीला मोफत शिक्षणपद्धती, आरोग्य आणि निवृत्ती वेतनाच्या मुद्द्यांवर तुम्ही काम करा. हे कठीण आहे. पण, आजच्या घडीला यावर काम करण्यास सुरुवात केल्यास एके दिवशी या गोष्टी साध्य होतील', असं ट्विट त्यांनी केलं. 

अमेरिकेतील रुग्णालयात मिळणारे उपचार पाहता, फार कमी जनताच तिथपर्यंत पोहोचावी असं का होतं?, असा प्रश्नही कपूर यांनी उपस्थित करत अमेरिकेत अधिकांश डॉक्टर आणि शिक्षक हे भारतीय असल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. आपण मांडलेल्या मुद्द्यांवर लक्ष दिल्यास अपेक्षित भारताची प्रतिमा येत्या काही वर्षांमध्ये पाहता येईल अशा आशाही त्यांनी व्यक्त केल्या. 

तुमच्या हाती संपूर्ण पाच वर्षांचा काळ देण्यात आला आहे. त्यामुळे याविषयी विचार करत माणुसकीच्या दृष्टीनेही आपण साऱ्यांसाठीच एक आदर्श प्रस्थापित करु , असं ते म्हणाले. आपल्या या वक्तव्यात अतिशयोक्ती आढळल्या कपूर यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. पण, एक नागरिक म्हणून मात्र या गोष्टी मांडणं गरजेचं असल्याचं ठाम मतही त्यांनी मांडलं.