सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला

Tiger 3 Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलामन खानचा बहुचर्चित टायगर-3 हा चित्रपट देश-परदेशातल्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लबाड प्रेक्षकांचा अति उत्साह नडतोय.

राजीव कासले | Updated: Nov 13, 2023, 09:07 PM IST
सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला title=

Tiger 3 Salman Khan : दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर-3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 12 नोव्हेंबरला हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लडबाज प्रेक्षकांकडून अतिउत्साह पाहिला मिळतोय. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'टायगर-3' (Tiger 3) चित्रपटादरम्यान सलमान खानच्या एन्ट्रीला चक्क सिनेमागृहात प्रेश्रकांनी फटाक्यांची आतषबाजी (Fireworks inisde Theaters) केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान संतापला असून त्याने चाहत्यांसाठी एक ट्विट केलं आहे.

सिनेमागृहात फटाक्यांची आतषबाजी
मालेगावात भाईजान सलमान खानच्या चित्रपटादरम्यान त्याच्या उत्साही चाहत्यांनी हद्द पार केली. हुल्लडबाज चाहत्यांनी सलमानच्या एन्ट्रीला चक्क फटाके फोडलेत. मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये हा प्रकार घडलाय. सलमानचा चित्रपट सुरु होता, पडद्यावर सलमान झळकला तसा अचानक हुल्लडबाज चाहत्यांनी आतषबाजी केली. अनार, रॉकेट्स उडवले. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचा जीव धोक्यात आला होता. थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. थिएटरमध्ये आग लागतील असे बरेच घटक असतात. खरंतर  थिएटरमध्ये प्रवेश करतानाच तपासणी होते. मात्र या हुल्लडबाजांना फटाके थिएटरमध्ये कसे नेऊ दिले हा प्रश्नच आहे.

सलमान खान संतापला
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खानने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्याने म्हटलंय 'टायगर-3' चित्रपटादरम्यान काही जण चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी करत आहेत, हे खूप धोकादायक आहे. कोणाचाही जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घ्या, सुरक्षित राहा' असं सलमानने म्हटलंय. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिोत काही प्रेक्षक चित्रपटगृहात अगदी स्क्रिनजवळ उभं राहुन रॉकेट, बॉम्ब फोडताना दिसत आहेत केवळ मालेगावच नाही तर देशात इतरही काही ठिकाणी असे प्रकार घडले असून याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून सलमान खानने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

12 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित
सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 हा चित्रपटा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला देशभरात प्रदर्शित झाला. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार 'टायगर-3' ने पहिल्या दिवशी तब्बल 43 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. सलमान खानचं टॉप-5 बिगेस्ट ओपनिंग चित्रपटांमध्ये टायगर-3 चा समावेश झाला आहे. यात 'भारत', 'प्रेम रतन धन पायो', 'टायगर जिंदा है', या चित्रपटांचा समावेश आहे. 'टायगर-3' मध्ये सलमान खान शिवाय कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. मनीष शर्मा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.