आणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र

पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

Updated: Dec 13, 2018, 09:43 AM IST
आणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र  title=

मुंबई : Assembly elections देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता वेगळ्याच वादांना तोंड फुटलं आहे. पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवही यात मागे नाहीत. 

बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच निकाल लागलेल्या विधानसभा निवडणूकांविषयी आपलं मत मांडत काही गोष्टी स्पष्ट केल्या. यावेळी त्यांनी हनुमानाच्या जातीविषयी केलेल्या एका वक्तव्याविषयी सारवासारवही केल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या याच वक्तव्याला निशाणा करत 'सपा'च्या अखिलेश यादव यांनी योगींवर टीकास्त्र सोडलं. 

योगींच्या त्या वक्तव्याचा 'सपा'ला फायदाच आहे, असं म्हणत त्यांनी बरं झालं असतं जर योगींनी आणखी काही देवांच्या जातींविषयीची माहिती दिली असती, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका केली. 

लखनऊ येथे समाजवादी पार्टीच्या मुख्यालयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'जर त्यांनी (योगी आदित्यनाथ यांनी) आणखी काही देवांच्या जाती सांगितल्या तर, आमचं काम आणखी सोपं होईल. अशा वेळी इथे-तिथे कोणत्याची गोष्टीसाठी प्रार्थना करण्यापेक्षा, आम्हीही आमच्याच जात- पंथाच्या देवाकडूनच सर्वकाही मागू. पण, आता तर त्यांनाच सांगावं लागणार आहे ती नेमकं कोणत्या देवाने त्यांना काय दिलं', असं म्हणत आपल्या सूचक आणि खोचक विधानातून त्यांनी योगींवर टीका केली. 

पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणूकांच्या माध्यमातून आता भाजपला सडेतोड उत्तर मिळत आहे. जीएसटी आणि नोटाबंदीचे परिणाम आता साऱ्या देशात दिसू लागले आहेत , ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. सोबतच राहुल गांधी यांना शुभेच्छा देत काँग्रेस अध्यक्षांनी आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी आशा व्यक्त केली. अखिलेश यांच्या या वक्तव्यावर आता योगी आणखी काही स्पष्टीकरण देणार का, याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.