राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 29, 2023, 11:06 AM IST
राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच... title=

Nitin Gadkaris Big Announcement: देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे निर्णय घेत असतात. त्यांच्या या निर्णयाचे देशभरात कौतुक होताना दिसते. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? याचा सर्वसामान्य प्रवाशांना कसा होईल फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कामगिरी-आधारित देखभाल आणि अल्पकालीन देखभाल करार मजबूत करण्यात गुंतले आहे.

सर्वसाधारणपणे रस्ते तीन प्रकारे बांधले जातात. ‘बिल्ड-ऑपरेट-हँडओव्हर’ (BOT) व्यतिरिक्त, यामध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) आणि हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) यांचा यामध्ये समावेश आहे. ईपीसीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची गरज लवकर सुरू होते. त्याच बरोबर BOT च्या माध्यमातून रस्ते चांगले बनवले जातात. कारण पुढील 15-20 वर्षे देखभालीचा खर्च त्यांना उचलावा लागतो, हे ठेकेदाराला माहीत आहे. त्यामुळे आम्ही BOT च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधण्याचा निर्णय घेतल्याचे गडकरींनी सांगितले. 

टोल टॅक्स कधी वसूल केला जातो?

BOT प्रकल्पांमध्ये खासगी भागीदार 20-30 वर्षांच्या कालावधीत प्रकल्पांचे वित्तपुरवठा, बांधकाम आणि संचालन करतात आणि नंतर त्यांची गुंतवणूक महामार्ग वापरकर्त्यांकडून शुल्क किंवा टोलद्वारे वसूल करतात. पावसामुळे महामार्गांचे नुकसान होण्याची आणि खड्डे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांचे सेफ्टी ऑडिट केले जाते. राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त व्हावेत यासाठी धोरण आखले जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तरुण अभियंत्यांना बोर्डात घेतले जाईल, अशी माहिती गडकरींनी दिली.

मंत्रालयाकडून 1 लाख 46 हजार किमी लांबीचे महामार्ग मॅपिंग

मंत्रालयाने संपूर्ण 1,46,000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मॅप केले आहे आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यासाठी कामगिरीवर आधारित देखभाल आणि अल्पकालीन देखभाल कंत्राटे सक्षम केली आहेत, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी दिली.