पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधींची टीका, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात  JEE आणि NEET ची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. 

Updated: Aug 30, 2020, 02:56 PM IST
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधींची टीका, म्हणाले... title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी खोचकपणे निशाणा साधला आहे. आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी भारतातील खेळण्यांची बाजारपेठ विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आता सर्वांसाठी देशी खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचे मोदींनी सांगितले.

'लेट द गेम बिगिन', मोदींचा नवा मंत्र

याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. राहुल यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातील JEE-NEET चे परीक्षार्थी पंतप्रधान मोदी काय बोलतात, याकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांना 'परीक्षा पे चर्चा' हवी आहे. मात्र, पंतप्रधानांनी 'खिलोनो पे चर्चा' केली, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली. 

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात  JEE आणि NEET ची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार येत्या १३ सप्टेंबरला NEETची परीक्षा होणार आहे. तर JEE ची परीक्षाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांना देशभरातून अनुक्रमे ९.५३ लाख आणि १५.९७ लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोनवेळ या परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षा होणारच, या भूमिकेवर सरकार ठाम आहे. 

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून परीक्षा घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. या परीक्षा रद्द करण्यासाठी काँग्रेसने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप असे राजकारण रंगले आहे.