पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरच्या तपासात काय आढळलं?

या सर्व प्रकरणानंतर ट्विटरने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

Updated: Dec 12, 2021, 11:22 AM IST
पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरच्या तपासात काय आढळलं? title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट रविवारी काही काळासाठी हॅक करण्यात आलं होतं. इतकेच नाही तर या हँडलवरून एक ट्विट देखील केलं. या ट्विटमध्ये, भारताने बिटकॉइनला अधिकृतरीत्या कायदेशीर मान्यता दिली आहे, असं नमूद करण्यात आलं.

या बातमीच्या ट्विटनंतर लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलंय. पीएमओच्या वतीने असं सांगण्यात आले की, ट्विटरने हे प्रकरण उचलल्यानंतर लगेचच खातं सुरक्षित करण्यात आलं. 

ट्विटरकडून निवेदन

या सर्व प्रकरणानंतर ट्विटरने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटमध्ये गडबड झाल्याची माहिती मिळताच आम्ही तत्काळ सक्रिय झालो, असे ट्विटरवरून सांगण्यात आलं.

आतापर्यंतच्या आमच्या तपासातून जे समोर आले आहे त्यानुसार, आतापर्यंत इतर कोणत्याही खात्यावर परिणाम झाल्याचे संकेत मिळालेले नाहीत. आमच्या सेवा पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी 24 तास, 7 दिवस खुल्या आहेत. आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळताच, आमच्या टीमने हॅक झालेलं अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली असल्याचं निवेदनात म्हटलंय.

ट्विटर हॅक झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड करण्यात आली आहे. हे प्रकरण ट्विटरकडे नेण्यात आलं. त्यानंतर अकाऊंट सुरक्षित करण्यात आलं. खाते हॅक करताना जे काही छेडछाड केली गेली किंवा शेअर केली गेली त्याकडे दुर्लक्ष करावं."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर 7 कोटी 34 लाख फॉलोअर्स आहेत. हॅक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं अकाऊंट रिस्टोअर करण्यात आलं असून या काळात चुकीची माहिती देणारे ट्विट काढून टाकण्यात आलं आहे.

पीएम मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर, त्यांच्या हँडलवरून ट्विट करण्यात आलं की, "भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारलं आहे. सरकारने अधिकृतपणे 500 BTC खरेदी केली आहेत आणि ते देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना वितरित करण्यात येत आहेत."