दुपारी १ वाजेपर्यंत कोल्हापुरात सर्वाधिक मतदानाची नोंद

दुपारी १.०० वाजेपर्यंत मुंबईत केवळ २५ टक्के मतदान नोंदवलं गेलंय

Updated: Oct 21, 2019, 03:17 PM IST
दुपारी १ वाजेपर्यंत कोल्हापुरात सर्वाधिक मतदानाची नोंद  title=

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९  साठी राज्यात सकाळ सत्रानंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून येतोय. राज्यात मतदानाचा निरूत्साह कायम राहिल्यानं दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात केवळ ३० टक्के मतदानाची नोंद झालीय. चांगली गोष्ट म्हणजे, कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजे ३३ टक्के मतदानाची नोंद झालीय. तर मुंबईत केवळ २५ टक्के मतदान नोंदवलं गेलंय. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धीमाध्यम कक्षाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत ७,३९७ पैंकी ६३९० मतदान केंद्रांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार २६.०६ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ११,५५,४६२ पुरुष आणि ७,३७,१९५ व १२८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यातील एकूण १८ लाख, ९२ हजार ७८५ मतदारांनी मतदान केले आहे.

आज अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळीत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मतदान केलं. तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमधील लोणीमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भाजपा नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनीही ठाण्यात मतदान केलं. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजपाकडून रिंगणात असलेले हर्षवर्धन पाटील यांनी मतदान केलं. 

मतदानाची टक्केवारी (दुपारी १.०० वाजेपर्यंत)

- नांदेड : जिल्ह्यातील ९ मतदारसंघात सरासरी २५.९७ टक्के मतदानाची नोंद झाली 

- सिंधुदुर्ग : सरासरी २५.९४ टक्के मतदानाची नोंद झाली. कणकवली - २९.३४ टक्के, कुडाळ - २३.८६ टक्के, सावंतवाडी - २४.४७ टक्के 

- सातारा : सरासरी २५.६१ टक्के मतदानाची नोंद 

- नंदूरबार : सरासरी २८.०८ टक्के मतदानाची नोंद (जिल्ह्यात सर्वात कमी मतदान नंदुरबार विधानसभा मतदारसंघात), शहादा ३७.४२ टक्के, अक्कलकुवा ३८.५२ टक्के, नवापूर ४१.५२ टक्के 

- बीड : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान

- बुलढाणा : जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.९१ टक्के मतदान

- नाशिक : दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात २८.४० टक्के मतदान 

- हिंगोली : सरासरी ३६.५१ टक्के मतदान 

- धुळे जिल्हा : ३१.७९ टक्के मतदान 

- धुळे शहर - २४.५६ टक्के मतदान  

- शिंदखेडा - ३५.५० टक्के मतदान 

- धुळे ग्रामीण - २८.६२ टक्के मतदान 

- साक्री - ३२.३० टक्के मतदान 

- शिरपूर - ३८.३८ टक्के मतदान  

राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी मतदान केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदान केलं. नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री निवडणूक लढतायत. त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीसही उपस्थित होत्या. तर उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्र्यात मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे, वरळीमधून शिवसेनेचे उमेदवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. तर शरद पवारांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला. पवारांनी मुंबईत मतदान केलं तर पवारांच्या कुटुंबीयांनी बारामतीत मतदान केलं. मतदानाची आकडेवारी पाहता मतदारराजाने मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचं आवाहन यावेळी शरद पवारांनी केलं. 

मतदानाला सकाळी सात वाजता सुरूवात झाल्यावर मोहन भागवत, अजित पवार, उद्यनराजे भोसले या दिग्गजांनी मतदान केलं. मतदानाला गर्दी होण्याआधीच या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करा फरक पडतो असं आवाहनही त्यांनी केलं. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब मतदान केलं. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, आणि मुलगी सारा यांनी मतदानाचा हक्क बजावला. तरुणांना मतदान करण्याचं आवाहन सचिन तेंडुलकरनं मतदारांना केलंय.