जितेंद्र शिंगाडे, नागपूर : पालकांनो आपल्या मुलाच्या हाती मोबाईल देत असाल तर सावधान. ही बातमी वाचून तुम्हाला ही धक्का बसेल. मोबाईल फोनवर खेळू न दिल्याने क्रिश लुनावत नावाच्या १४ वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मोबाईल जीवघेणे झाले आहेत. मोबाईल फोनची सवय लहान मुलांसाठी किती घातक ठरू लागलीय याचं उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं. आईने खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने १४ वर्षांच्या क्रिश लुनावत या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. क्रिशला टीव्ही आणि मोबाईलवर खेळण्याचं अक्षरशः व्यसन लागलं होतं.
क्रिशची आई मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिने क्रिशचा मोबाईल आपल्यासोबत नेला. संध्याकाळी क्रिशची मोठी बहीण घरी आल्यावर तिला क्रिश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
हे पण वाचा : व्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात
मोबाईलच्या व्यसनापायी क्रिश घराबाहेर पडायचा नाही, त्याला मित्र नव्हते. एवढंच काय तो शाळेतही जात नव्हता. आपलं मुल सतत मोबाईलवर खेळत असेल तर हे कौतुकास्पद निश्चितच नाही.
मोबाईलमुळे मुलांचं खेळणं बागडणं कमी झालंय. मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढतोय. मुलांच्या अभ्यासावर आणि आकलनशक्तीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यांवरही वाईट परिणाम होत आहेत.
मुलांना समजावून, वेळप्रसंगी धाकात घेऊन हा मोबाईल मुलांपासून वेळीच दूर नेण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी आधी मोबाईल स्वतःपासून दूर करणं श्रेयस्कर होईल.