पुण्यात शनिवार पेठेतील जोशी संकुल इमारतीला मोठी आग

पुणे शहरातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीत सकाळी आग लागली. 

Updated: May 16, 2019, 04:13 PM IST
पुण्यात शनिवार पेठेतील जोशी संकुल इमारतीला मोठी आग title=

पुणे : शहरातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीमधील ऑफिस वजा गोडाऊनला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तब्बल तीन ते साडेतीन तासाच्या प्रयतन्नानंतर ही आग आटोक्यात आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी यामुळे पेठेतील इमारतींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

वेळ सकाळी सात वाजताची. प्रभात टॉकीजसमोरील गल्लीतील या इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागली. पुण्यातील जोशी संकुल इमारतीतील काही रहिवाशांना इमारतीमधून धूर येताना दिसला. चौकशी केल्यानंतर हा धूर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या ऑर्थो लीन मार्केटिंग या कंपनीच्या ऑफिसमधून येताना दिसला. लगेचच रहिवाशांनी इमारतीतील लाईटचे मुख्य स्विच बंद केले आणि अग्निशमन दलाला फोन लावला.

अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहिल्या मजल्यावर ऑफिसर दार तोडण्यात आले आणि आग विझविण्याचे काम सुरू झाले. ऑफिसमध्ये हॉस्पिटलसाठी लागणार सर्जिकल मटेरियल आणि केमिकल असल्याने आग विझविण्यास अनेक अडथळे येत होते. केमिकल मुळे विझल्यानंतरही बराच वेळ धुराचे लोट येत होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी  या आगीवर नियंत्रण आणले. दरम्यान, इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जोशी संकुल ही पाच मजली इमारत असून इमारतीमध्ये २० फ्लॅट आहेत. या आगीत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

आगीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र आग का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आग लागल्याचं कळताच महापौर मुक्ता टिळक या देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, याबाबत पंचनामा करून दोषींवर कारवाई करू असा महापौर आश्वासन मुक्ता टिळक यांनी दिल आहे. 
 
जोशी संकुल या पाच मजली इमारतीमध्ये एकूण २० सदनिका आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती काही दुकाने आणि ऑफिसेस आहेत. इमारतीच्या आजूबाजूलाही अनेक छपाईची दुकान आहेत. मात्र अचानक आग लागली तर ती विझवण्यासाठी कुठलीही यंत्रणा ठिकाणी त्यांच्याकडे नाही. तर जोशी संकुलमधील फायर फायटिंग सिस्टिम देखील बंद असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे इमारतीचे फायर ऑडिट झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.