लोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांची टीका

Gautami Patil : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र आता महाराष्ट्रचा बिहार होईल असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.

Updated: Apr 8, 2023, 06:36 PM IST
लोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांची टीका title=

Gautami Patil : लावणी डान्सर गौतमी पाटीलने सध्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलने (Gautami Patil Dance) कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गावातील जत्रा असो की कुणाचा वाढदिवस गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रभर आयोजित केले जात आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना लहानांपासून मोठ्यापर्यंत इतकचं नाहीतर महिला प्रेक्षकांचीही तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. गौतमीच्या डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. पण आता गौतमी पाटीलला मिळणाऱ्या मानधनावरुन वेगळाच वाद सुरु झाला आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (indurikar maharaj) यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं आणि नवा वाद सुरु झाला. आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम करून आम्हाला संरक्षण मिळत नाही आणि गौतमी पाटीलला संरक्षण दिले जाते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. त्यामुळे गौतमी पाटील खरंच तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेते का? तसेच तिच्या एका कार्यक्रमाचं मानधन किती? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. दुसरीकडे जेष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर (Raghuvir Khedkar) यांनीही गौतमी पाटीलला मिळणाऱ्या मानधनावरुन जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

"आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही," असं इंदुरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात म्हटलं. इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता.

प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराजांनंतर आता तमाशाकलावंतांनी ही गौतमी पाटील ला कार्यक्रमाच्या सुपारी वरून लक्ष केलं आहे. बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाही आणि दुसरीकडे चार मुली पाचवी गौतमी पाटील असलेल्या कार्यक्रमाला पाच पाच लाख रुपये देतात हे काय चाललंय. लोककलेची गौतमी करू नका अन्यथा महाराष्ट्र हा बिहार होईल असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे?

"बऱ्याच गावातील लोक 100 कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये देण्यासाठी खुटतात. अक्षरक्षः हात जोडतात. गौतमी पाटीलला पाच लाख रुपये देतात. कलेची गौतमी पाटील करु नका. लोककला लोककलाच राहिली पाहिजे. मुले कोणत्या वळणाला चालली आहेत. आई वडिलांचे लक्ष कुठे आहे? मुलगा रात्री कोणाच्या कार्यक्रमाला जातोय हे विचारत का नाही? तुमच्या मुलाला हरिपाठ पाठ नाही आणि गौतमी पाटीलची सगळी गाणी पाठ आहेत. काय चाललंय हे? तमाशाला आजपर्यंत नावं ठेवली जात होती. तमाशामधल्या कुठल्या मुलीने असे हातवारे केले होते? गौतमी पाटीलने केलेले हातवारे पाहण्यासाठी तुम्ही मारामाऱ्या करता. महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? याकडे पालकांनी, राजकारण्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल," असा घणाघात रघुवीर खेडकर यांनी केला आहे.