बहुमतासाठी भाजपचं 'ऑपरेशन देवेंद्र'! ४ नेते लागले कामाला

भाजपानं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राज्यात विशेष ऑपरेशन सुरू केलं आहे.

Updated: Nov 24, 2019, 08:00 PM IST
बहुमतासाठी भाजपचं 'ऑपरेशन देवेंद्र'! ४ नेते लागले कामाला title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भाजपानं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राज्यात विशेष ऑपरेशन सुरू केलं आहे. या मोहिमेला ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव देण्यात आलंय. बेरजेच्या राजकारणासाठी चार नेत्यांना कामालाही लावण्यात आलंय.

बहुमताची अग्निपरीक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायची आहे. बहुमताचा जादुई आकडा गोळा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि टीम कामाला लागलीय. महाराष्ट्रातील या ऑपरेशनला भाजपानं ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव दिलंय.

भाजपाची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला ऑपरेशन देवेंद्रमध्ये सहभागी असलेले आमदार उपस्थित नव्हते. ऑपरेशन देवेंद्रमध्ये गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि नारायण राणेंचाही समावेश असल्याची चर्चा आहे. आशिष शेलारांनीही तसंच सांगितलंय.

एकीकडे भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन सरकार स्थिर आहे असं सांगतायत. दुसरीकडं आमदारांची बेगमी करण्यासाठी भाजपानं नेते कामाला लावलेत. आता ऑपरेशन देवेंद्र यशस्वी होतंय का हेच पाहावं लागेल.