मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक

मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या सीरियल मोलेस्टरला अटक.

Updated: Feb 19, 2019, 11:47 PM IST
मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक title=
संग्रहित छाया

मुंबई : लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या सीरियल मोलेस्टरला अटक करण्यात आली आहे. तारीख ९ फेब्रुवारी. ठिकाण - सीएसएमटी स्थानक. लोकलमध्ये एक महिला चढली. याचवेळी अटक करण्यात आलेल्या अश्रफअलीमुळे या महिलेला धावत्या लोकलमधून उडी मारावी लागली होती. कारण या अश्रफअलीने विनयभंग करण्यासाठी पुढे सरसावला आणि महिलेने स्वत:ची सुटका करण्यासाठी धावत्या लोकलमधून झोकून दिले. सीएसएमटी स्थानकामधून सुटलेल्या एका लोकलमध्ये एक महिला चढली. डब्यात महिला एकटीच चढल्याचं अश्रफअली करीमुल्ला शेखने पाहिले आणि तोही त्या डब्यात चढला. अश्रफअली महिलेच्या अंगावर धावून गेला. त्याने विनयभंग केला. त्या महिलेला वाटले की मस्जिद स्थानकावर लोकल थांबेल. पण ती बहुधा जलद गाडी असल्याने थांबली नाही. अखेर त्या महिलेला लोकलमधून उडी मारावी लागली. या घटनेनंतर रेल्वेतील महिला सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, अखेर रेल्वे सुरक्षा दलाला हा अश्रफअली करीमुल्ला शेख सापडला. विशेष म्हणजे २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला एका वर्षाची शिक्षाही झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर अश्रफअली सुधरलाच नाही, अशी माहिती जीआरपीचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तर कराड यांनी दिली. सोमवारी अश्रफअली चर्चगेटला येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यावेळी त्याने पोलिसांवर हल्लाही केला. मात्र, पोलिसांनी त्याला त्याब्यात घेत अटक केली. पोलिसांनी अश्रफला पुन्हा बेड्या घातल्या आहेत.