राणेंचा एकाकी लढा...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदी पायउतार झाल्यापासून नेहमी त्याच स्पर्धेत राहीलेले कोकणचे एक बलाढ्य नेतृत्व..पण 'कोकणाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनवेन' अशा गर्जना करणारे नारायण राणे आजघडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे.

Updated: Nov 29, 2011, 06:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'कोकणाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनवेन' अशा  गर्जना करणारे नारायण राणे आजघडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे. पोटनिवडणुकांमध्ये समर्थकाचा विजय मिळवल्यावर शिवसेनेतून इनकमिंग सुरु झालंय अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली खरी. पण त्यानंतर मात्र कनेक्शन कुठे कापल गेलं कळलच नाही आणि इनकमिंग काही दिसलंच नाही. महाराष्ट्राने पाहिला तो फक्त नारायण राणेंचा एकाकी लढा. विरोधकांशी आणि स्वपक्षियांशी. नारायण राणे..

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदी पायउतार झाल्यापासून नेहमी त्याच स्पर्धेत राहीलेले कोकणचे एक बलाढ्य नेतृत्व.. नारायण राणेनी मालवणची ती ऐतिहासिक पोटनिवडणूक जिंकताच मालवण म्हणजे अवघं कोकण.. आणि हे कोकण फक्त कॉंग्रेसचा बालेकिल्ला होणार अशी वातावरणनिर्मिती करणार नारायण राणे पुरते यशस्वी झाले.. आणि त्यानंतर सुरु झाला तो नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष.. नायगाव, वेंगुर्ला आणि राजापूर या तीन पोटनिवडणूकीत राणेंनी आपल्या समर्थकाना निवडून आणले खरे..पण श्रीवर्धनचा पराभव राणेंच्या जिव्हारी लागला आणि शिवसेनेला बळकटी मिळायला सुरुवात झाली. पण श्रीवर्धन नंतर काँग्रेसच्या गोटातून राणेंवर निर्बंध लादण्यात आले.. आणि तिथुनच सुरु झाली नारायण राणेंची घुसमट.. मुंबई महानगरपालिकाच्या मागील निवडणूकातही मालवणी व्होटर हा पुन्हा शिवसेनेकडेच वळल्याचा अहवाल निष्ठावंतानी दिल्ली दरबारी पोहोचवला. त्यानंतर गोवा निवडणूकीत राणेना दिलेल्या विधानसभा मतदार संघात भाजपचे कमळ हसलं होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेवरही युतीचाच झेंडा लागला.. या एकूण साऱ्या घडामोडीत मुंबईवर २६ अकराचा हल्ला झाला आणि अशोक चव्हाणांची खुर्ची गेली.. हीच अखेरची संधी आहे, असं मानत नारायण राणेनी पक्षनेतृत्वावर तोफ डागली.. विलासरावांशी वैर ओढवून घेतलं आणि अखेर राणेंना वर्षाएवजी ज्ञानेश्वरीवरच धन्यता मानावी लागली.. 'एकतर मी संपेन किवा कॉंग्रेसला तरी संपवेन' या प्रतिज्ञेचे पुढे काय झालं हे कोणालाच कळलं नाही.. दरम्यानच्या काळात नारायण राणेंसोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या समर्थकांपैकी अनेकानी लांब राहणचं पसंत केलंय..जयवंत परब, भास्कर विचारे, श्रीकांत सरमळकर सेनेत परतलेयत. विजय वडेट्टीवारानी तर मी राणेसमर्थक नव्हतोच अस सांगत वेगळी वाट चोखाळली. नंदकुमार काळे राष्ट्रवादीत गेले..... प्रकाश भारसाकळेनीही भाजपात राहणं पसंत केलंय.. आज नारायण राणे यांच्या सोबतीला आहेत ते केवळ कालीदास कोळंबकर, विनायक निम्हण.. कोकणचा बालेकिल्ला करुन दाखवेन अशी शपथ घेतलेल्या नारायण राणेंच्या काँग्रेसला पनवेलपासून मालवणपर्यंत विधानसभेच्या  फक्त दोन जागा मिळाल्यायत.. खुद्द सिंधुदुर्गात विजय सावंताच्या रुपाने जुन्या काँग्रेसचे तर दिपक केसरकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे कडवं तर वैभव नाईक, परशुराम उपरकर आणि प्रमोद जठार याच्या युतीचे आव्हान आहेच.. जैतापूरप्रश्नी आक्रमक झालेल्या शिवसेनेला रत्नागिरीत बळ मिळतेय तर रायगडपट्ट्यात राष्ट्रवादी आक्रमक आहे..  यासाऱ्यात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पारडे जड आहे.. एकूणच राणे शिवसेनेत असतानाही जेवढे विरोधक कॉंग्रेसमध्ये नव्हते एवढे विरोधक आज राणेना कॉंग्रेसमध्ये पहायला मिळतायत..

 

आणि या साऱ्यात बाळासाहेबांनी साद घातलेल्या चिमण्या पुन्हा मातोश्रीकडे वळतायत.. आणि या साऱ्या कोकणच्या किनाऱ्यावर एकटे दिसतायत ते फक्त नारायण राणे...