20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणूक रिंगणात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोयीच्या आघाड्या करून ‘राजकीय खिचडी’ केलीय. त्या खिचडीला आता फोडणी मिळतेय ती घराणेशाहीची. सांगलीतल्या 20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणुकीला उभे आहेत. मतदारराजा या राजकीय घराणेशाहीवर मतांची मोहोर उमटवणार का?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2017, 05:03 PM IST
20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणूक रिंगणात title=

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोयीच्या आघाड्या करून ‘राजकीय खिचडी’ केलीय. त्या खिचडीला आता फोडणी मिळतेय ती घराणेशाहीची. सांगलीतल्या 20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणुकीला उभे आहेत. मतदारराजा या राजकीय घराणेशाहीवर मतांची मोहोर उमटवणार का?

सांगलीमध्ये राजकीय खिचडी चांगलीच पकलीय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे आता उघडपणे गळ्यात गळे घालून फिरतायत. शिराळा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. तर कडेगाव आणि पलूस तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपनं उघड आघाडी केलीय. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी आणि राष्ट्रवादी अशी आघाडी असून, त्या विरोधात भाजप आणि काँग्रेस अशी नवी आघाडी तयार झालीय.

वाळव्यात राष्ट्रवादी विरोधात भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय यांची आघाडी निवडणूक लढवतेय. मिरज तालुक्यात भाजपविरोधात काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आहे. तासगावमध्ये  भाजपविरोधात राष्ट्रवादी, तर जतमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होतोय. आटपाडी-खानापूरमध्ये भाजप, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होतेय.

त्यातच दिग्गज नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना तिकीटं वाटून घराणेशाही जिवंत ठेवलीय. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत बागणी जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीकडून निवडणूक लढवतायत. आयुष्यभर घराणेशाहीवर टीका करणा-या सदाभाऊंनीच मुलाला उमेदवारी दिल्यानं आता त्यांच्यावरही तोंडसुख घेतलं जातंय.

गंमत म्हणजे माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्या घरातले प्रत्येकी तीन सदस्यही झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. जयंत पाटलांचे चुलत पुतणे देवराज पाटील कासेगाव पंचायत समिती गणातून, चुलत पुतणी संगीता पाटील कासेगावमधून आणि चुलत बहिण संध्या पाटील वाटेगाव झेडपी गटातून निवडणुकीस उभ्या आहेत.

पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड कुंडलमधून, मेव्हणीचा मुलगा विक्रम सावंत उमदीतून, पतंगरावांचे मोठे बंधू आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची सून वैशाली कदम देवराष्ट्रमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.

भाजप खासदार संजयकाका पाटील यांचे काका डी.के. पाटील चिंचणीतून, भाजप आमदार शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव सत्यजित नाईक वाकुर्डे बुद्रक पंचायत समितीतून, भाजप आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप तिकोंडीतून, तर शिवसेना आमदार अनिल बाबर  यांचे चिरंजीव सुहास बाबर नागेवाडीतून आपलं नशीब आजमावत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख हे  कोकरूडमधून, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचा मुलगा वैभव शिंदे  हे बागणीतून, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत भाऊ संग्रामसिह देशमुख हे कडेपूरमधून, राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुतणे सम्राट नाईक वाकुर्डे बुद्रकमधून आणि भावजय अश्विनी नाईक मांगलेतून, माजी आमदार सदाशिव पाटील यांचे चिरंजीव विशाल पाटील नागेवाडीतून आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशमुख आटपाडीमधून निवडणूक लढवत आहेत.