प. रेल्वे रुळावर, मोटरमनची माघार आश्वासनांवर!

Last Updated: Friday, July 20, 2012 - 20:58

www.24taas.com, मुंबई

पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने संप अखेर मागे घेण्यात आलाय. डीआरएमच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामध्ये मोटरमनच्या काही मागण्यांवर विचार करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चार तास मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प. रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्टेशनांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, संप मिटल्यानंतर चर्चगेटहून पहिली लोकल रवाना झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मोटरमनच्या संपामुळे रस्तेवाहतूकीवर मोठा परिणाम झाला. सगळीकडे मोठ्याप्रमाणात ट्राफिक जाम झालं होतं.
हक्काची साप्ताहिक सुटी मिळावी, मोटरमनच्या मदतीला सहाय्यक चालक द्यावा तसेच किरकोळ चुकांसाठी निलंबनाची कारवाई केली जाऊ नये, अशा प्रमुख मागण्यांसाठी पश्चिम रेल्वेचे मोटरमन दुपारी अचानक सामूहिक सुटीवर गेले होते. त्यामुळे कार्यालयांतून घरी परतणा-या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांच्या या गैरसोयींची तातडीने दखल घेत प्रशासनाने मोटरमनच्या संघटनांशी तत्काळ चर्चा सुरू केली.

 

या बैठकीत प्रशासनाने मोटरमनच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून सर्व २०० मोटरमन कामावर रुजू झाले आहेत.

First Published: Friday, July 20, 2012 - 20:58
comments powered by Disqus