मी राजीनामा देण्यास तयार, पण... - मुख्यमंत्री चव्हाण

राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2014, 03:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबतची चर्चा जोर धरत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, राधाकृष्ण विखेपाटील, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चित्र आहे. असे असतानाच आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाकडून देण्यात येणारी कोणतीही जबाबदारी स्वीकारेन, असे म्हणून खांदेपालटाच्या वृत्ताला अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला आहे. ते पुण्यात बोलत होते.
पक्षनेतृत्वाचा निर्णय अंतिम असून तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल. पक्षनेतृत्व देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत. हायकमांडचा निर्णय योग्यवेळी समोर येईलच, तोपर्यंत राज्याचा प्रमुख या नात्याने संपूर्ण निष्ठेने काम करत राहीन, असेही ते म्हणाले.
येत्या दिवाळीआधी विधानसभा निवडणुका असल्याने राज्यात मुख्यमंत्री बदलाची खेळी काँग्रेसकडून केली जाण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामावर काही काँग्रेस आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण हटाव मोहीमला जोर धरत आहे. मात्र, चव्हाण गुगली टाकून वरिष्ठांकडे चेंडू लगावला.
काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून सुशीलकुमार ओळखले जातात त्यामुळे शिंदे यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप तरी काँग्रेसकडून अधिकृतरित्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.