राष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 6, 2012, 04:32 PM IST

www.24taas.com,रत्नागिरी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही नेते साहेबांच्या मर्जीतील असल्याने साहेब काय निर्णय घेतात, याची उत्सुकता लागली आहे.
चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच संघर्ष निर्माण झालाय. चिपळूणचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुनील तटकरे यांनी हायजॅक केल्याची टीका रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचेच नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. जिल्ह्याबाहेरच्या तटकरेंना स्वागताध्यक्षपद मिळाल्यानं आपण दुःखी असल्याचंही भास्कर जाधव म्हणाले. सुनील तटकरे यांनीच कोकणात गटबाजी आणली. त्यांच्यामुळं कोकणातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झालाचं त्यांनी सांगितलं.
साहित्य संमेलनाला वैयक्तीक देणगी देण्यासाठी आपल्याकडं घोटाळ्यांचा पैसा नसल्याचा टोलाही त्यांनी तटकरेंना लगावला. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपद आपल्याकडं आल्यानं भास्कर जाधवांचा गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलयं. आपण भास्कर जाधवांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं.
संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे तिथल्या सहका-यांनी आग्रह केल्यानं घेतल्य़ाचंही तटकरेंनी सांगितलयं. सुनील तटकरे काहीही सांगत असले तरी राष्ट्रवादीतला संघर्ष या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे.
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यात जुना वाद आहे. त्यातच सामंत यांनी सुनील तटकरे यांच्याशी जमवून घेतल्याने कोकणात राष्ट्रवादीत वाद असल्याचे पुढे आले. सामंत आणि तटकरे यांची मैत्री जाधव यांना डोईजड होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. तर चिपळूनमध्ये माजी आमदार रमेश कदम यांच्याशी जाधव यांची वैर आहे. त्यामुळे जाधव रत्नागिरीतमध्ये आता या नव्या वादामुळे एकटे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांनी केलेली टीका त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत.