VIDEO: धोनीने मारला १११ मीटर लांब सिक्स, गेल-रसेलला मागे टाकलं

आयपीएल २०१९मध्ये रविवारी बंगळुरू आणि चेन्नईमध्ये झालेली मॅच अत्यंत रोमांचक झाली.

Updated: Apr 22, 2019, 03:35 PM IST
VIDEO: धोनीने मारला १११ मीटर लांब सिक्स, गेल-रसेलला मागे टाकलं title=

बंगळुरू : आयपीएल २०१९मध्ये रविवारी बंगळुरू आणि चेन्नईमध्ये झालेली मॅच अत्यंत रोमांचक झाली. महेंद्रसिंग धोनीच्या एकाकी झुंजीमुळे चेन्नईने गमावलेल्या मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण तरी शेवटच्या बॉलवर बंगळुरूचा १ रननी विजय झाला. शेवटच्या बॉलवर २ रनची गरज असताना धोनीच्या बॅटला बॉल लागला नाही. तरी धोनीनं एक रन काढण्याचा प्रयत्न केला. पण पार्थिव पटेलने स्टम्पवर थ्रो मारून बंगळुरूला जिंकवून दिलं.

चेन्नईच्या टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी २६ रनची गरज होती, पण त्यांना फक्त २४ रनच करता आल्या.

या मॅचमध्ये धोनीने ८४ रनची नाबाद खेळी केली. यामध्ये ७ सिक्स आणि ५ फोरचा समावेश होता. धोनीनं आयपीएलच्या या मोसमातला सगळ्यात लांब सिक्स मारला. उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं मारलेला सिक्स मैदानाच्या बाहेर गेला. धोनीनं मारलेला हा सिक्स तब्बल १११ मीटर लांब गेला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला हा सगळ्यात लांब सिक्स होता. याआधी हार्दिक पांड्याने १०४ मीटर लांब सिक्स मारला होता.

कोलकात्याच्या आंद्र रसेलने या मोसमात ९८ मीटर लांब सिक्स लगावला होता. तर क्रिस गेलने ३० मार्चला मुंबईविरुद्ध १०१ मीटर लांब सिक्स मारला होता. कोलकाताच्या क्रिस लिननेही या मोसमात १०२ मीटर लांब सिक्स टोलावला होता. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २०३ सिक्स लगावले आहेत.