www.24taas.com, मुंबई
टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की मंत्रालयाने लवकरच आमिर खान याच्या मदतीने कुपोषण विरुद्ध शिक्षण उपक्रम सुरू करण्याची योजना बनवली आहे. या प्रचार अभियानासाठी आमिर खान विनामोबदला काम करणार आहे. यात ऑडिओ, व्हिडिओ, प्रिंट जाहिरातींशिवाय एसएमएसचाही समावेश असेल. या जाहिरातींचं काम सध्या चालू आहे. तीन स्तरांमध्ये या जाहिराती पाहायला मिळतील.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, देशात असेही काही लोक आहेत, ज्यांना कुपोषणाची साधी माहितीही नाही. म्हणूनच, आधी आमिर खान कुपोषणाबद्दल माहिती देईल. यानंतर कुपोषणाबद्दल संदेश दिला जाईल. कुपोषण रोखण्यासाठी जनता काय करू शकते, कुपोषणाची समस्या कशी दूर होईल यावर आमिर खान जनजागृती करेल.