Dr. Manmohan Singh Demise : भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून ख्याती असणाऱ्या आणि आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण देश हळहळला आहे. गुरुवारी वाढत्या वयाशी संबंधित आजारपणामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि देशाच्या माजी पंतप्रधानांनी या जगाचा निरोप घेतला.
वयाच्या 92व्या वर्षी मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 2004 ते 2014 दरम्यान सलग 10 वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपद भूषवलं होतं. इतकंच नव्हे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. जागतिक स्तरावर एक निष्णात अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. सहसा चेहऱ्यावर स्मित आणि मितभाषी, संयमी पंतप्रधान अशी ओळख असणारे डॉ. सिंग हे त्यांच्या वक्तव्यांसाठीही ओळखले जात होते.
आपल्या अखेरच्या पत्रकार परिषदेदरम्यानही त्यांनी केलेलं वक्तव्य आजही सर्वांच्या स्मरणात असून, या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर आता त्याच पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं मनमोहन सिंग यांनी अतिशय मोजक्या शब्दांत विरोधकांना आणि देशातील तत्कालीन राजकीय परिस्थितीला विचारात ठेवत उत्तर दिलं होतं.
3 जानेवारी 2014 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान डॉ. सिंग यांना समकालीम माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या चर्चा आणि त्यांनी काही प्रसंगी कारवाई करण्याची पावलं उचलली नाहीत याविषयीचा एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
'अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर, मला असं वाटतं की समकालिन माध्यमं किंबहुना संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल', असं थेट उत्तर त्यांनी दिलं आणि त्यांच्या या हजरजबाबीपणानं सर्वांची मनं जिंकली.
'कॅबिनेटमध्ये नेमकं काय काय घडतं हे मी सांगू शकत नाही. कारण, युतीमध्येही काही गोष्टी, काही बंधनं असतात' असं म्हणताना आपण त्या परिस्थितीमध्ये उत्तमोत्तम आणि प्रामाणिक कामगिरी केल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं.
Manmohan Singh once said ‘History will be kinder to me’
You was absolutely right sir #Manmohan Singh ji pic.twitter.com/KblIzvrYkm
— Ravish Pal Singh (@ReporterRavish) December 26, 2024
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, शुक्रवारचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.