....अन् आठवला अपयशाचा सामना करण्यासाठीचा डॉ. कलाम यांचा 'हा' मंत्र

कलाम यांनी सांगितलेल्या एका अनुभवाने तुम्हालाही मिळेल मोठी शिकवण

Updated: Sep 8, 2019, 09:29 AM IST
....अन् आठवला अपयशाचा सामना करण्यासाठीचा डॉ. कलाम यांचा 'हा' मंत्र  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'चांद्रयान २' मोहिमेमध्ये काही प्रमाणात अडथळे अल्यानंतर अनेक स्तरांतून या मोहिमेविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे इस्रोच्या प्रयत्नांची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली. राजकीय वर्तुळापासून कला विश्वापर्यंत सर्वांनीच इस्रोच्या या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला त्यांच्या कामाची दाद दिली. सरतेशेवटी या मोहिमेत आलेल्या अडचणी पाहता अपयशाच्या सावलीने खचून जाऊ नका, असा संदेशही प्रत्येकानेच दिला. यामध्येच सोशल मीडियावर एका अद्वितीय व्यक्तीचा व्हिडिओही व्हायरल झाला. ज्यामधून अपयश आणि यशाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा कशा प्रकारे सामना करण्याविषयीचा एक अनुभव जो खूप काही शिकवून गेला, त्याचीच चर्चा आहे. 

हा अनुभव सांगितला होता, खुद्द भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी. 'चांद्रयान २' मोहिमेच्या या वळणावर कलामांचा तो अनुभव नक्कीच सर्वांना धीर देणारा ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओमध्ये त्यांनी १९७९ या वर्षातील एका घटनेचा संदर्भ दिल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी SLV-3 या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण, ही मोहिम अपयशी ठरली आणि टीकेची झोड या मोहिमेत सहभागी असणाऱ्यांवर करण्यात आली. त्यावेळी इस्रोच्या प्रमुख पदी होते, खुद्द सतीश धवन. 

२०१३ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान १९७९ या वर्षातील त्या प्रसंगाविषयी सांगताना कलाम म्हणाले, 'मी त्यावेळी त्या मोहिमेचा प्रमुख होतो. अंतराळातील कक्षेत म्हणजेच ऑर्बिटमध्ये उपग्रह पाठवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. जवळपास दहा वर्षे अनेकांनी या मोहिमेसाठी मेहनत घेतली होती. त्यावेळी मी श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचलो. उलट मोजणी सुरु झाली. T minus 4 minutes, T minus 3 minutes, T minus 2 minutes, T minus 1 minute, T minus 40 seconds... ज्यानंतर उपग्रहाचं प्रक्षेपण थांबवण्याचा इशारा संगणकाकडून देण्यात आला. मोहिमेचा प्रमुख म्हणून मला निर्णय घ्यायचा होता. तंत्रज्ञांनाही अडचण उमगली होती. प्रक्षेपणात काही अडचणी उदभवल्या होत्या. इंधन गळतीची समस्या समोर आली होती. पण, मुबलक प्रमाणात इंधन असल्याचं सांगत, मोहिम ठरल्याप्रमाणेच सुरु राहिल असा निर्णय मी घेतला. अखेर मी त्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा निर्णय घेतला', असं कलाम म्हणाले होते. 

तज्ज्ञ, तंत्रज्ञांच्या मतानंतर त्यांनी उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा निर्णय घेतला होता. पण, अखेर. चार टप्प्यांच्या त्या प्रक्षेपण प्रक्रियेत पहिला टप्पा सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर मात्र गणित बिघडलं. तो उपग्रह अंतराळात जाण्याऐवजी, बंगालच्या उपसागरात जाऊन पोहोचला. पहिल्यांदाच अपयशाचा अशा प्रकारे सामना करणाऱ्या कलामांनी हा सर्वस्वी आपला निर्णय असल्याचं सांगितलं. पण, त्यावेळी माध्यमांच्या टीकेचा सामना मात्र खुद्द सतीश धवन यांनी केला होता. इस्रोचे प्रमुख म्हणून त्यांनी या मोहिमेच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत, अतिशय विश्वासार्ह आणि मेहनती अशा सहकार्यांच्या सहाय्याने वर्षभरातच आपण ही मोहिम यशस्वी करुन दाखवण्याचा विश्वास त्यांनी माध्यमांना दिला. 

याचसंदर्भात पुढे सांगताना कलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्याच वर्षी १८ जुलै, १९८० मध्ये रोहिणी आरएस१चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इस्रोप्रमुख सतीश धवन यांनी त्यांना पत्रकार परिषदेस संबोधण्यास सांगितलं.  याविषयी सांगत कलाम म्हणाले होते, 'धवन यांच्या त्या कृतीतून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे जेव्हा अपयशाचा सामना करावा लागतो, तेव्हा संबंधित ठिकाणचा प्रमुख त्याची जबाबदारी स्वीकारतो. पण, जेव्हा यशाचं श्रेय देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते संपूर्ण टीमला, त्या कामात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला देण्यात येतं. ही एक अशी शिकवण आहे, जी मला कोणत्याही पुस्तकातील संदर्भाच्या वाचनातून मिळाली नाही. तर, ही शिकवण मला अनुभवांतून मिळाली.'