आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

Updated: Aug 1, 2012, 04:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

आपल्याला अशक्तपणा जाणवतोय पण आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये मात्र जाणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. उपोषणानं नाही पण तिथं गेल्यावर मात्र आपण नक्कीच मरणार असं त्यांना वाटतंय. ‘मी आत्महत्या करत नाहीए तर देशातील लोकांसाठी हे बलिदान असेल’, असं त्यांनी म्हटलंय.

अरविंद केजरीवाल यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी राम मनोहर लोहिया या सरकारी हॉस्पिटलमधून स्वास्थ्यासंबंधी माहिती घेणं बंद केलंय. आपल्याला या हॉस्पिटलवर भरवसा नसल्याचं त्यांनी आपल्या समर्थकांना कळवलंय. ‘मला अशक्तपणा जाणवतोय. पण माझ्यावर आत्महत्येचा आरोप करून मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण, सरकारनं असं काही पाऊल उचललं तर तुम्हीच त्यांचा मनसुबा हाणून पाडा, असं आवाहनच केजरीवाल यांनी त्यांच्या समर्थकांना केलंय.

अण्णांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवत म्हटलंय की, ‘लोक आत्महत्या तेव्हाच करतात जेव्हा ते समस्यांचा सामना करत असतात. पण केजरीवाल त्यातले नाहीत.’ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांना अशक्तपणा आला असला तरी त्यांची तब्येत स्थिर आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू असल्यानं मैदानात तुरळक उपस्थिती दिसतेय. केजरीवाल यांच्यासोबतच टीम अण्णा सदस्य मनीष सिसोदिया आणि गोपाल राय यांच्याही उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.

.