अण्णा, तुम्ही 'केजरीवाल' व्हाच...

Updated: Feb 11, 2015, 07:58 PM IST


 

सुनील घुमे : अरविंद केजरीवाल यांनी इतिहास घडवला...

देश काँग्रेसमुक्त करण्याचं नरेंद्र मोदींचं स्वप्न दिल्लीपुरतं का होईना, केजरीवालांनी साकार केलं. केजरीवालांच्या झाडूचा तडाखा असा काही बसला की, भाजपच्या कमळाचाही कचरा झाला. ज्या दिल्लीनं लोकसभा निवडणुकीत शत प्रतिशत भाजपला निवडून दिलं होतं, त्याच भाजपचे कसेबसे 3 आमदार निवडून आले. 70 पैकी 67 जागा जिंकून, मोदींच्या नाकावर टिच्चून केजरीवालांनी दिल्लीचं तख्त काबीज केलं.

2013 च्या निवडणुकीत केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला पहिल्यांदा जेव्हा 28 जागा मिळाल्या, तेव्हा 'राजकीय अपघात' अशी नोंद भल्याभल्या पोलिटिकल पंडितांनी केली. 49 दिवसांच्या राजवटीनंतर केजरीवालांनी राजीनामा दिला तेव्हा नव्याचे नऊ दिवस संपले, अशा शब्दांत त्यांची टर उडवण्यात आली. लोकसभा निवडणुकीतल्या मोदी लाटेत आपचा धुव्वा उडाला तेव्हा तर केजरीवाल आणि कंपनीचं दुकान बंद झाल्याचा आनंद अनेकांनी बोलून दाखवला. त्यामुळं दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा भाजपवाले हवेतच होते. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र अशी राज्यं काबीज केल्यानंतर तर मोदी लाट देशभरात पसरत असल्याची हवा निर्माण करण्यात आली. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपवाल्यांचा हा फुगा फुटला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये एन्ट्री करणा-या किरण बेदींचा डाव फसला. शाझिया इल्मींसारख्या रातोरात नेत्या झालेल्यांचा भ्रमाचा भोपळाही फुटला. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अरविंद केजरीवालांनी दिल्लीच्या सिंहासनावर 'घरवापसी' केली...

केजरीवालांनी घडवलेला हा चमत्कार पाहिल्यानंतर एक भाबडा विचार मनात आला. जे राजधानी दिल्लीत घडू शकतं, ते महाराष्ट्रात का घडू शकत नाही? केजरीवालांसारखा एक आम आदमी एक राजकीय पक्ष उभा काय करतो, गोरगरीब झोपडीवासीय आणि रिक्षावाल्यांपासून ते आयआयटीत शिकणा-या तरूणाईपर्यंत सगळ्यांवर जादूची कांडी काय फिरवतो, आणि दिल्लीसारख्या महानगराची सत्ता खेचून काय आणतो, सगळंच चमत्कारी... आणि कल्पनेच्या पलीकडचं... असंच काहीतरी अद्भुत महाराष्ट्रात का घडू शकत नाही?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार गेलं आणि भाजप-शिवसेनेचं सरकार आलं... पण आम आदमीच्या जीवनात काही फरक पडला का? सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण टेंभा मिरवत असलो तरी भ्रष्टाचाराच्या आणि गैरकारभाराच्या वाळवीनं ती पुरती पोखरली गेलीय, हे उघड सत्य आहे. त्यामुळं काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं आलं आणि उद्या भाजपचं सरकार जाऊन पुन्हा काँग्रेसवाले आले तरी आम आदमीच्या जीवनात काहीच फरक पडत नाही. स्वातंत्र्यांच्या सात दशकानंतरही पिण्याचं पाणी, रस्ते, वीज हेच आम आदमीसाठी ज्वलंत प्रश्न असतात. सामान्य माणसाला अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक नकोय किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा एक मीटर उंच सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतळाही नकोय... त्यांना हवंय ते स्वच्छ आणि नियमित पिण्याचं पाणी, खड्डे नसलेले रस्ते, 24 तास अखंडित वीज, स्वच्छ परिसर आणि निर्भयपणं जगता येईल असं वातावरण... आरक्षण नकोय, पण नोक-यांच्या संधी उपलब्ध करून दिल्यात तर त्या हव्या आहेत... केजरीवालांनी काय केलं, सामान्य माणसाच्या याच स्वप्नांना पंख दिले. आता दिल्लीतल्या आम आदमीची आणि महाराष्ट्रातल्या आम आदमीची स्वप्नं का वेगळी आहेत? मग दिल्लीतला प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी का होऊ शकत नाही?


 

खरं तर अरविंद केजरीवाल ज्यांना राजकीय गुरू मानतात, ते अण्णा हजारे महाराष्ट्राचे... अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळंच अरविंद केजरीवाल हे नाव घराघरात ओळखलं जाऊ लागलं. आता अण्णांमुळे केजरीवाल फेमस झाले की, केजरीवालांमुळे अण्णांच्या आंदोलनाला यश मिळालं, हे सांगणं फारच कठीण आहे. कारण केजरीवालांचं डोकं नसतं तर अण्णांची रामलीला दिल्लीत किती रंगली असती कोण जाणे? केजरीवाल अजूनही आपण अण्णांचे चेले आहोत, असं जाहीरपणं सांगतात. निदान वरकरणी तरी... अण्णा त्यांना आपला चेला मानत नाहीत, हा भाग वेगळा... मला वाटतं की, अण्णांचं काही चुकत असेल तर ते हेच... म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्ही आंदोलन उभं करता, चळवळ निर्माण करता, सामान्य माणसामध्ये काहीतरी बदलाची आशा निर्माण करता आणि हे सगळं यशस्वी झाल्यानंतर जेव्हा निवडणुकांची वेळ येते, तेव्हा मात्र माघार घेता... सिस्टीममध्ये दोष आहेत, हे मान्य... राजकीय नेते भ्रष्ट आहेत, हे देखील मान्य... मग ही सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीममध्येच शिरायला नको का? म्हणजे अण्णा हजारेंनी राजकारणी भ्रष्ट आहेत, असं सांगायचं. त्यांच्या विरोधात उपोषणं करायची.. मग जनतेने निवडून तरी कुणाला द्यायचं, हे देखील त्यांनीच सांगायला नको का? कल्पना करा की, दिल्लीतल्या त्या ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर 'टीम अण्णा'नंच राजकीय पर्याय उभा केला असता तर संपूर्ण भारतातच वेगळं चित्र निर्माण झालं नसतं का?

जे अण्णांनी केलं नाही, ते केजरीवालांनी करून दाखवलं...काँग्रेस आणि भाजपला समर्थ असा आम आदमी पार्टीचा तिसरा पर्याय दिल्लीत उभा केला. दिल्लीकर नशीबवान आहेत, त्यांना असा पर्याय मिळाला. महाराष्ट्रातल्या नागरिकांना असा तिसरा समर्थ पर्याय कधी उपलब्ध होणार? स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक उमेदवार राजकारणात उतरायला हवेत, असं सगळेच मानतात. पण त्याची सुरूवात करणार कोण? जे केजरीवालांनी केलं, तेच अण्णा हजारेंनीही करायला नको का? राजकारणात न उतरण्याचा हट्ट सोडून, अण्णा हजारेंनी एक राजकीय पक्ष निर्माण करायला हवा. किमान स्वच्छ चारित्र्याचे आणि काहीतरी कल्याणकारी घडवण्याची मानसिकता बाळगणारे चांगले उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून उभे करायला हवेत. हल्ली चोर आणि दरोडेखोर यांच्यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येते. मग नाईलाजानं 'नोटा'चं बटन दाबावं लागतं. मात्र असं नकारात्मक मतदान करण्यापेक्षा काहीतरी चांगले बदल घडवण्यासाठी सकारात्मक मतदान करण्याची संधी महाराष्ट्राला कधी मिळणार? अण्णा हजारेंनी मनावर घेतलं तर अनेक चांगल्या व्यक्ती राजकारणात उतरतील. पण त्यासाठी अण्णांना केजरीवाल व्हावं लागेल...

अण्णा, आता तरी तुम्ही 'केजरीवाल' व्हाच...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.