ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 2, 2013, 09:02 AM IST

.

आई माझी सहामाही परीक्षा झाली की मी अजिबात अभ्यासाला हात लावणार नाही. मी खूप मजा करणार! मला नविन कपडे हवेत आणि फटाके. मी खूप फटाके फोडणार. मला आधी सांग तू बाबांना काय काय सांगणार?...हा संवाद कोकणात दिवाळीची चाहूल लागल्यावर शाळेत जाणाऱ्या छोट्या मंडळींकडून ऐकायला मिळतो. आपल्या बाळाचा आनंद पाहून आई बोलण्याचा प्रयत्न करीत असते. पण तिच्या बाळाला आईचे काही ऐकायचे नसते, हेच संवादातून जाणवते. तर दुसरीकडे घरात दिवाळीआधी फराळाची तयारी करण्यात आईची तारांबळ असते. घरात खमंग वास आला की समजावे काही दिवसांवर दिवाळी आली आहे. हे चित्र कोकणातील खेड्यापाड्यात दिसून येते.

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी. याला कोकणात अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो. ही परंपरा व्यापारीवर्गाने आजही टिकवून ठेवली आहे. तर धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनही करण्याची परंपरा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये या परंपरेला महत्त्व दिले गेलेय. दिवाळीत धन्वंतरी पुजनाच्यावेळी कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा सात्विन वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा लोप पावण्याची भीती आहे. आजही ही प्रथा काही ठिकाणी दिसते.
दिवाळीसाठी बाळगोपाळांची लगबग सुरू असते. कोणी गड-किल्ले बनविण्यासाठी तयारी करतो. किल्ला तयार झाला की आपला लाडका राजा शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी मावळे आणण्यासाठी बाबांचा हात पकडून बच्चे मंडळी बाजारात जातात. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. निसर्गाचा होणार ऱ्हास आणि वाढत्या सिमेंटच्या जंगलात आता हे चित्र दिसत नाही. काही ठिकाणी ही परंपरा जपण्याचा प्रयत्न काही संस्था किल्ले स्पर्धा घेऊन करताना दिसत आहे. कोकणात गड-किल्ले आजही आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे बुरूज ढाळत आहेत. ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने जुन्या आठवणी बच्चे मंडळींमुळे ताज्या होतात.
कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी. कोकणातील देऊळ आणि मंदिरांमध्ये होणारा दीपोत्सव ही एक वेगळीच ओळख आहे. आजही गावागावांतील देवळांसमोर दीपस्तंभ आहे. हे दीपस्तंभ दिवाळीत दिव्यांनी उजळून निघतात. पूर्वी या दीपस्तंभांवर पणत्या ठेवल्या जात असत. आता मात्र, यात थोडासा बदल झालेला दिसून येत आहे. विजेच्या तोरणांना अधिक पसंती दिली जात आहे. घरांसमोरच्या अंगणात आकाश कंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामट्यांपासून चांदणी किंवा आकाश कंदील बनविण्यावर भर दिसतो. तर काही ठिकाणी ` रेडिमेड` आकाश कंदिलांचा प्राधान्य दिले जात आहे. दिवाळी निमित्ताने कोकणात येणारे चाकरमानी चिनी बनावटीचे कंदील आणि विजेच्या दीपमाळा एक नाविण्य म्हणून आणत असल्याचे चित्र दिसत आहे. बांबूंच्या कामट्यापासून बसविल्या वस्तुंचा जागा चिनी बनावटीने घेतली पाहायला मिळत आहे. आजही रांगोळी काढण्याची प्रथा दिसून येते. घरासमोर रांगोळी काढली जाते.
दिवाळी सणात नरकचतुर्दशीला महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवशी पहाटे लवकर उठून उठणे लावून गरम पाण्याने अभ्यंग स्नान करणे. त्यानंतर कारीट फोडणे फोडले जाते. तेही डाव्यापायाच्या अंगठ्याने. यासाठी घराघरांतून शर्यती लावल्या जातात. ते कारीट फोडल्यानंतर त्यातील बी जीभेला जावयाची आणि आपल्या माथ्याला. कारीटाचे बी जीभेला लावल्यानंतर तोंड कडू होते. मग तोंड वाकडे करून अंग फुसून बच्चे मंडळी नविन कपडे अंगावर चढवून फटाके फोडायला धूम ठोकतात. तिकडे आई हाक मारून अरे, दिवाळीचा फराळ कर, असे सांगत असते. मात्र, बच्चे मंडळींचे सर्व लक्ष फटाके फोडण्याकडेच असते, असे चित्र पाहायला मिळते. तसेच अभ्यंग स्नानाच्यावेळी जो उशीरा उठेल, तो नरकात जातो, असाही एक समज आहे. अंगणातील तुळशी वृंदावनासमोरची जागा शेणाने सारवून घेऊन, त्यावर कडू चव असणारे `कारीट` ठेवून ते डाव्या पायाच्या आंगठ्याने फोडले जाते. मग नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याआधी आई किंवा पत्नी प्रत्येकाला आरती घेऊन ओवाळत