गणेशपूरमधून 'निशाणी डावा अंगठा गायब'

साधारणतः विद्यार्थी शाळेच्या पुस्तकातले धडे गिरवतात. मात्र जालना जिल्ह्यात एक गाव आहे, जे स्वतःचं जिवंत पुस्तक बनलंय. गावातलं प्रत्येक घर म्हणजे एक धडा आणि त्याच्या भिंती म्हणजे या अवाढव्य पुस्तकाची पानं. अख्ख्या गावाला साक्षर करणारे असे प्रयोग महाराष्ट्रभर झाले तर निशाणी डावा अंगठा उमटवण्याची गरज कुठेच भासणार नाही. रहा एक पाऊल पुढे, असं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 09:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जालना
साधारणतः विद्यार्थी शाळेच्या पुस्तकातले धडे गिरवतात... मात्र जालना जिल्ह्यात एक गाव आहे, जे स्वतःचं जिवंत पुस्तक बनलंय... गावातलं प्रत्येक घर म्हणजे एक धडा आणि त्याच्या भिंती म्हणजे या अवाढव्य पुस्तकाची पानं... अख्ख्या गावाला साक्षर करणारे असे प्रयोग महाराष्ट्रभर झाले तर निशाणी डावा अंगठा उमटवण्याची गरज कुठेच भासणार नाही... रहा एक पाऊल पुढे, असं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...

गणेशपूर.. जालना जिल्ह्यातल्या याच गणेशपूरच्या प्राथमिक शाळेत प्रफुल्ल सोनावणे नावाच्या शिक्षकानं अनोखी शिक्षण क्रांती घडवून आणलीय. अगदी सहज चालता चालता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरवता यावेत, यासाठी या शिक्षकाने गावातील सर्व घरांना गुलाबी रंग दिला. त्या घरांच्या भिंतीवरच मुलांसाठीचा शालेय अभ्यासक्रम रेखाटला...

प्राथमिक शाळेतील मुलांना सहज आणि सोप्या भाषेत शिक्षण मिळावं, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या वाढावी हा सोनावणेंचा खरा उद्देश होता. या प्रयोगामुळं अतिशय कमी वेळात हा उद्देश साध्य झाला.

गणेशपूरच्या प्राथमिक शाळेत सोनावणेंची बदली झाली, त्यावेळी इथला शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक नव्हता. गावाकडचं शिक्षण म्हणजे ढक्क्लपास अशी शिक्षणाची व्याख्या केली जायची. पण सोनावणेंनी शिक्षणाचं गुलाबी चित्र गावक-यांना पटवून दिलं. या शिक्षकामुळे गाव बदलणार म्हणून सरपंच, गावकरी आणि शालेय शिक्षण समितीही पुढे आली. गावातल्या सगळ्या ७० घरांना गुलाबी रंग लावण्यात आला.

गाव गुलाबी करण्यासाठी लागणारा ३५ हजारांचा खर्चही सोनावणेंनीच उचलला. या गुलाबी घरांच्या भिंतींवरच इंग्रजी महिने, मराठी अक्षरे, उजळणी, राज्य प्रतीके, राष्ट्रीय प्रतीके, इंग्रजी सुविचार, मानवी शरीराच्या अवयवांना इंग्रजीत काय म्हणायचं इथपर्यंत सगळा अभ्यासक्रम रेखाटण्यात आला. विद्यार्थ्यांचं गणित आणि इतिहास अधिक मजबूत व्हावा यासाठी या दोन विषयांचा अभ्यासक्रम रेखाटताना खास लक्ष देण्यात आल.

आता शिक्षकानं एवढी मेहनत घेतल्यानंतर विद्यार्थी तरी कसे ढ राहतील. शाळेत जाताना आणि शाळेतून येताना सगळेच विद्यार्थी भिंतीवरचे धडे गिरवायला लागले. आणि ते एवढे हुशार झाले की, इंग्रजी, गणित, सगळ्यांना गोल करणारा भूगोल हे त्यांचे आवडते विषय बनले. त्यामुळंच गणेशपूरच्या प्राथमिक शाळेला उन्नत अभियानात जिल्ह्यात पहिलं स्थान मिळालं.
विद्यार्थ्यांचं मडकं पक्कं करण्याचा सोनावणे सरांचा उद्देश यातून सहज यशस्वी झालाच. पण गावातल्या बायाबापड्याही भिंतींवरचा अभ्यास वाचून –वाचून व्यवहार ज्ञानात चतुर बनल्या.
अगदी गावात दिवसभर एकाच जागी बसणारे ७५ वर्षाचे राजकारणी बाबाही खडाखडा मराठी वाचायला शिकलेय. सोनावणे सरांचा सिलॅबस इफेक्ट कुठपर्यंत पोहचलाय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एका शिक्षकानं घडवलेल्या या चमत्कारामुळं त्यांचे वरिष्ठही त्यांच्यावर जाम खुश आहेत.
प्रफुल्ल सोनावणे यांनी ही अनोखी शिक्षण क्रांती घडवून आपलं काम थांबवलं नाही. गोरगरिबांच्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी दत्तक घेतलंय. या शिक्षकाच्या समाजसेवी वृत्तीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी गरज आहे ती प्रफुल्ल सोनावणेंसारख्या एक पाऊल पुढे राहणा-या शिक्षकांची...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ