सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप

सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस लोढा समितीनं आपल्या अहवालात केलीय. याच शिफारशींमुळं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडालीय. 

Updated: Jan 7, 2016, 04:32 PM IST
सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप title=

मुंबई : सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस लोढा समितीनं आपल्या अहवालात केलीय. याच शिफारशींमुळं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडालीय. 

सट्टाबाजार एक काळी दुनिया...  छुपा काळा धंदा... त्यावर असलेला माफियाचा कंट्रोल आता बनणार भूतकाळातल्या गोष्टी... कारण, बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कारभार सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लोढा समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये काही शिफारशी सुचवल्या आहेत. यात सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारसही समितीनं सुचवलीय आणि त्यामुळंच अंडरवर्ल्ड हादरलंय.

जाणकारांच्या मते सट्टेबाजी कायदेशीर झाल्यास अंडरवर्ल्डचा यातील वावर कमी होईल, काळ्या पैशाचा वापर संपेल, अंडरवर्ल्डचं हजारो कोटींचं नुकसान होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. तसंच सट्टा लावणाऱ्यांना अंडरवर्ल्डची भीती राहणार नाही, सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणारा अंडरवर्ल्डचा ग्रुप निष्क्रिय होईल आणि अंडरवर्ल्ड आणि बुकींकडे जाणारा जवळपास बारा हजार कोटींपेक्षा ज्यादा पैसा कर-रुपात सरकारी तिजोरीत जमा होईल असंही जाणकारांना वाटतंय.

यामुळे, सगळ्यात जास्त नुकसान हे 'डी कंपनी'चं होणार आहे. अंडरवर्ल्डमध्ये दाऊद गँग सर्वाधिक बुकींना कंट्रोल करतं. 

- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सट्टेबाजीवर दाऊदचा कंट्रोल

- पाकिस्तान, दुबई, आफ्रिकेतील सट्टेबाजीचा कारभार दाऊद गँगच्या छत्रछायेखालीच चालतो.

- सट्टेबाजीतून दाऊदला जवळपास पाच हजार कोटींचा फायदा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. हा सगळा काळा धंदा दाऊदचा छोटा भाऊ अनीस इब्राहिम सांभाळतो.

- अनीसच्या हाताखाली पाकिस्तानात सलमान मास्टर, दुबईत सुनील दुबई, आफ्रिकेत फिरोज, नेपाळ तसंच पूर्व आशियाई देशात जीतू नेपाळी आणि संजय उर्फ छोटू काम पाहतात.

- याशिवाय पाकिस्तान आणि दुबईमध्ये अवैध टेलिफोन एक्सचेंजचा वापर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी केला जातो.

त्यामुळेच, आता लोढा समितीच्या शिफारशीनंतर हे सगळे हादरलेत.