कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, July 3, 2013 - 16:10

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोसळणाऱ्या पावसामुळे विविध भागात नद्यांना पूर आला आहे. चिपळूण, राजापूर, संगमेश्वर याठिकाणी पुराचे पाणी शहरात घुसले आहे. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजापूरमधील अर्जुना नदीला पूर आल्याने राजापूर शहरात पाच ते सहा फूट पाणी भरले आहे. तर रत्नागिरीमधील चांदेराई गावात पुराचे पाणी घुसले आहे.
पावसाचा बळी
पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील आकाश गोपाळ रिंगे हा १३ वर्षीय मुलगा शाळेतून घरी परत असताना येताना ओढ्याचा पाण्याचा लोंढा आल्याने वाहून गेला. त्याचा मृतदेह हाती सापडल्याची माहिती तहसीलदार रामदास सायगावकर यांनी यांनी दिलेय.

प्रवास टाळा - पोलीस
चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान आरवलीजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. येत्या २४ तासात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. शक्यतो मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

रायगडात पूर परिस्थिती
रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, पाली, सुधागड तालुक्यात मंगळवारी सकाळपासून संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. तसेच रोहा शहरातील त्रिमूर्तीनगर, परमारनगर, बाजारपेठ, दमखाडी भागात पाणी शिरले.

गोव्यालाही तडाखा
गोव्यात पावसाने झोडपून काढलेय. गोवा- कर्नाटक महामार्गावर अन्मोद घाटातही मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने दगड आणि माती रस्त्यावर आलेय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. घटनास्थळी मदत पथक पोहचले. रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, July 3, 2013 - 16:10
comments powered by Disqus