पंकज समेळ, मुंबई : जून महिना सुरु झाला असल्यामुळे पाऊस कधी सुरु होतो, ह्याची शेतकऱ्यापासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक जण चातक पक्ष्याप्रमाणे वाट बघतो. पावसाळा सुरु झाला की ज्याप्रमाणे जमिनीतून कुत्राच्या छत्र्या उगवतात, त्याचप्रमाणे फक्त पावसाळी भटकंती करणारे आणि नफ्याच्या मागे धावणारे अनेक ग्रुप उगवतात. आजकाल पावसाळा सुरु होण्याच्या एक-दोन आठवडे आधी काजवा उत्सवाबरोबर कॅम्पिंगचे नवीन खूळ सुरु झाले आहे. ह्या काजवा उत्सवामध्ये साधारणपणे ५०-६० जण एका ग्रुपमध्ये असतात. असे जर का ३-४ ग्रुप एखाद्या ठिकाणी काजवा उत्सवाला गेले असतील, तर त्यामुळे निसर्गाची किती हानी होत असेल, ह्याचा अंदाजच न केलेला चांगला. पण ह्या सर्व आयोजकांचे निसर्गापेक्षा मिळणाऱ्या नफ्याकडे जास्त लक्ष असते.
पावसाळा सुरु झाला की वर्षा सहलीपासून ते दुर्ग भटकंतीपर्यंत अनेक बेत रचले जातात. ठोसेघर, राजमाची, कोंढाणे लेणी, आंबोली, कास, कात्रज, सिंहगड, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, माळशेजघाट इ. भटक्यांची काही आवडीची ठिकाणे... पावसामुळे डोंगर हिरवेगार झालेले असतात, डोंगरावरून धबधबे वाहात असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे नटलेली असतात. सर्वत्र वातावरण कसे आल्हाददायक असते. पावसाळ्यात भटकंती करताना कोणती खबरदारी घ्यावी, काय काळजी घ्यावी ह्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...
पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टीकोनातून वाईट. पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास किंवा परिसराचे नसलेले भौगोलिक ज्ञान ह्या गोष्टींमुळे होतात. पावसाळ्यात कुठल्याही सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या ठिकाणाची, तेथे जाणाऱ्या विविध वाटांची पूर्ण माहिती करून घेणे. जर त्या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि धुवांधार पाऊस पडत असेल, तर गावातून एखादा मार्गदर्शक घेणे कधीही चांगले. परंतु, बऱ्याचवेळा एखाद्या ठिकाणाची माहिती मित्रांकडून किंवा नेट वरून घेतलेली असते. त्या ऐकीव माहितीच्या आधारे पर्यटक त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्या ठिकाणी स्वतः आधी भेट दिलेली नसल्यामुळे अनेक वेळा पर्यटक वाट चुकतात, क्वचित प्रसंगी आपला जीव पण गमावून बसतात. बऱ्याचदा होणारे अपघात त्या ठिकाणी असलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे आणि गावकऱ्यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे...
- तळलेला ब्रेड, नुडल्स आणि पास्ता गरम असतानाच खावेत. गार खाऊ नयेत
- आंबे, फणस, जांभळे आणि करवंदे शक्यतो टाळावीत. जरी खाल्ली तरी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये
- शक्यतो घरचेच पाणी प्यावे
- चिक्की, लाडू जवळ ठेवावे. भूक लागल्यास खावीत
- गोळ्या आणि चॉकलेट टाळावीत.
ट्रेकिंगला जाताना पाऊस, दाट धुके, उंच डोंगर, खोल दऱ्या, निसरड्या वाटा आणि चिखल यांचा विचार केला गेलेला असतो. कौटुंबिक सहलीसाठी आपण आपल्या परिवाराबरोबर अश्या ठिकाणी वरील गोष्टी विचारात न घेता जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण.
ट्रेकिंग किंवा गिर्यारोहण करताना आपण निसर्गाच्या जवळ जात असतो. निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करत असताना आपण त्यांची नोंद लेखी किंवा फोटोच्या रुपात करत असतो. गिर्यारोहण करताना स्वतःची काळजी घेत असताना आपल्या वस्तूंची पण योग्य काळजी घ्यायची असते.
पावसाळ्यात भटकंतीसाठी जाताना बरेच नवखे एका हातात छत्री, एका हातात छोटी बॅग आणि पायात सँडल अश्या पोशाखात जातात. पण त्यांना त्यांची चूक तिथे गेल्यानंतर समजते. पावसाळ्यात भटकंती करताना पायात चांगले रबरी बूट, अंगात रेनकोट / पाँचो आणि सॅक असलीच पाहिजे. डोंगर-दऱ्यामध्ये भटकंती करताना आधारासाठी हात आणि पाय मोकळे असलेच पाहिजेत.
पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. धुवाधार पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत असतात. किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटा गवत वाढल्यामुळे झाकल्या गेलेल्या असतात. पाणी आणि शेवाळे यांच्यामुळे दगड निसरडे झालेले असतात. अशावेळी भटकंती करताना विशेष काळजी घ्यावी.
भटकंतीची सॅक भरणे ही पण एक कला आहे आणि ती कला आपण अनुभवाने ग्रहण करतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात भटकंतीची सॅक भरताना काही त्रास होत नाही. पण पावसाळ्यात सॅक भरताना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कपडे, अंथरूण, मोबाईल आणि खाण्याचे पदार्थ पावसाने भिजू नये म्हणून सॅकमध्ये भरताना पहिल्यांद्या प्लास्टिक पिशवीत ठेवा आणि मग सॅकमध्ये भरा. कॅमेरा आणि मोबाईल बरोबर घेणार असाल तर त्याची पण योग्य काळजी घ्या. कपड्यांचा आणि सॉक्सचा जास्तीचा जोड, स्वतःची औषधे, विजेरी (torch), कोरडे खाण्याचे पदार्थ, पाण्याची बाटली, मेणबत्ती व काडेपेटी या गोष्टी प्लास्टिक पिशवीत ठेऊन आठवणीने सॅकमध्ये भरा... सॅकमध्ये मीठ व हळदसुद्धा आठवणीने भरा...
ज्याप्रमाणे आपण पावसाळ्यात भटकंतीसाठी बाहेर पडतो, त्याचप्रमाणे अनेक सरपटणारे प्राणी पण बिळात पाणी शिरल्यामुळे बाहेर पडतात. त्यामुळे भटकंती करताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात भटकंती करताना खासकरून जंगलातून किंवा चिखलातून जाताना जळवांचा त्रास होतो. अश्यावेळी पायाला मीठ लावावे. जळवा पायाला चिकटल्या असतील तर त्यांना कधीहि ओढू नका, ओढल्या तर त्या तुटतील. त्यापेक्षा त्यांच्यावर मीठ टाकावे. जळवा निघाल्यानंतर जखमेतून रक्त येत असल्यास जखमेवर हळद दाबून धरावी.
भटकंतीपाठोपाठ पावसाळ्यातील आणखीन एक मुख्य आकर्षण म्हणजे धबधबे. धबधब्याखाली उभे राहणे किंवा त्याच्या कुंडात डुंबत राहणे ह्या सर्वांच्या आवडीच्या गोष्टी. पण कधीकधी आपण माहिती करून न घेता कुंडात उडी मारतो, पण कुंडाच्या खोलीचा अंदाज न आल्यास ते जीवावर बेतू शकते. धबधब्यात उभे असताना अचानकपणे पाण्याचा जोर वाढल्यास धबधब्यातून सरळ बाहेर पडणे. कारण जोर वाढल्यास पाण्यातून मोठमोठे दगड पण वाहून येण्याची शक्यता असते व ते प्राणघातक सिद्ध होऊ शकते. ह्या सर्व अपघातांमध्ये निसर्गाची काहीही चूक नसताना तो मात्र नाहक बदनाम होतो.
पावसात भटकंती करा, पण भटकंती करत असताना स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या. भटकंती करताना संयम ठेवा. भटकंती करताना मला सर्व माहिती आहे हा अतिआत्मउत्साह दाखवू नका, विशेषतः पाण्याच्या ठिकाणी. निसर्गाचा योग्य तो मान राखा.
मग तुम्हीच ठरवा भटकंतीची आठवण आपल्या मनात कायमची कोरून ठेवायची की आपल्या छोट्याश्या चुकीने आपण दुसऱ्यांच्या मनात कायम घर करून राहायचे.
- गावातील गावकऱ्यांच्या सूचनांचा योग्य तो मान राखा. आपण एखाद्या ठिकाणी वर्षातून फक्त एकदाच जातो त्यामुळे आपल्याला तेथे असलेल्या धोक्यांची कल्पना नसते. परंतु गावकरी वर्षानुवर्षे तेथेच राहत असल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण माहिती असते
- भटकंतीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, वाटांची, पूर्ण माहिती करून घ्या. गरज पडल्यास गावातून एखादा वाटाड्या बरोबर घ्या
- रात्रीचा मुक्काम मंदिरात किंवा घरात करा. उघड्यावर किंवा निर्जन स्थळी मुक्काम करणे टाळावे
- धबधब्यात पाण्याबरोबर येणाऱ्या छोटे-मोठे दगडांमुळे अपघात होण्याच्या संभव असतो. कुंडाची खोली माहित नसल्यास कुंडात उतरण्याच्या प्रयत्न करू नका. ओढे-नाले ओलांडताना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे वाहून जाण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत
- एसटी किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना परतीच्या वेळापत्रकाची योग्य ती काळजी घ्या
- पायात रबरी बूट घालावे. चप्पल किंवा सँडल घालणे टाळावे
- भटकंतीला जाताना ज्यांच्या बरोबर जाणार आहात त्या पैकी एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घरात देऊन ठेवा. तसेच घरी पुन्हा कधी येणार ह्याची सुद्धा अंदाजे वेळ सांगून ठेवा.
- सर्वात मुख्य म्हणजे मद्यपान, धिंगाणा आणि कर्णकर्कश गाणी टाळा
('झी २४ तास'नं नेहमीच तुमच्यातल्या लेखकांना प्रोत्साहन दिलंय. वरील लेखाचे लेखक एका शेअर ब्रोकिंग कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत... नुकत्याच पार पडलेल्या 'गिरिमित्र संमेलना'त त्यांच्या https://pankajsamel.wordpress.com/ या ब्लॉग लेखनाला प्रथम क्रमांकानं गौरविण्यात आलं. पंकज यांचा लेण्या आणि किल्ल्यांबद्दलही चांगला अभ्यास आहे. त्याचनिमित्तानं ओळख आणखीन एका लेखकाची...)