close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ही आवडते मज मनापासुनी शाळा...!

शाळा आणि तुरुंग या दोनच जागा अश्या आहेत की जिथे दाखल केले जाते स्वतःहून कुणी जात नाही

Updated: Nov 9, 2017, 08:55 PM IST
 ही आवडते मज मनापासुनी शाळा...!

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शाळा आणि तुरुंग या दोनच जागा अश्या आहेत की जिथे दाखल केले जाते स्वतःहून कुणी जात नाही, जे.कृष्णमूर्ती या तत्व चिंतकाचे हे वाक्य  अनेक अर्थाने खरे असले तरी एकदा नाईलाजाने का होईना शाळेत गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींचा शाळा हा अविभाज्य  भाग  होऊन जाते. माझ्या घरच्यांनी जास्त शिक्षण जरी घेतलं नसलं तरी शिक्षणांच महत्त्व त्यांना माहित होतं.शिक्षण घेऊन मोठं ' साहेब ' होता येत, हे त्यांना पक्क माहित होतं. म्हणून ते मला न चूकता शाळेत पाठवायचे.माझी शाळा माझ्या घरापासून  फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर होती हे आज मुंबई सारख्या महानगरात राहताना स्वप्नवत वाटत असले तरी तेंव्हा मात्र संकट वाटायचे कधी कधी मूड नसलातरी शाळा जवळ असल्याने शाळेत जावेच लागे. त्या लहान वयात या शाळेचं महत्त्व कधी कळायचंच नाही.परंतु आता शाळेचं होत चालेलं बाजारीकरण बघून "आपण शिक्षण  सम्राटाच्या शाळेत शिकलो नाही,तर शिक्षणमहर्षीच्या शाळेत शिकलो याचा आज अभिमान वाटतोय ". 

        
भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारखं दुसरं काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र! काही जुनेच काही मागून आलेले. काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा ! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे वाटते. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा 1951 साली  महाराष्ट्राचे बुद्धीवैभव म्हणून ख्यातनाम असणाऱ्या बाळासाहेब भारदे यांनी 1951 साली स्थापन केलेली अहमदनगर जिल्हयातील पहिली शाळा आहे. त्या माझ्या शाळेच नाव आधी “ शेवगावं इंग्लीश स्कूल ” असे होते.आता 1995 पासून शाळेचेे नामकरण बाळासाहेब भारदे हायस्कूल असे केलें तेही मा शरद पवार यांच्या हस्ते! 


          
महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनच बाळासाहेब भारदे यांना मुख्यत: ओळखले जात  असले तरी त्यांची तेवढी  ओळख पुरेशी नाही. बाळासाहेब भारदे  मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत,संतसाहित्याचे अभ्यासक,सहकार क्षेत्रातील अग्रणी आणि पत्रकारही होते.  राजकारणाबरोबरच जीवनाच्या अन्य क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडलेले  तज्ञच, खरं तर त्यांना शिक्षणमहर्षिच म्हणावे लागेल. म्हणूनच त्यांचा गौरव ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन शासनाने सन्मान केलाय. 
           
या भारदे हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना ते शाळा कमी तर घर जास्त होतं. कारण शाळा सुटली तरी हायस्कूलच्या मैदान मध्ये खेळत बसायचो आणि थेट संध्याकाळीच घरी जेवायला जायचो. अभ्यासात कमी मैदानामध्ये  जास्त रमणारी आम्ही मुलं होतो.म्हणूनच मी कधीही सर्व विषयामध्ये 8 वी पर्य़ंत पास झालो नाही. सरांनी मला स.पास करत करत दहावी पर्यत पोहचवले. माझं वर्गात कमी बाहेर इतर एक्टिविटीज मध्ये जास्त लक्ष असायचं. सर नेहमी आम्हाला सांगत की शिक्षण घेऊऩ जॉब,व्यवसाय,किंवा इतर गोष्टी करा पण तुम्हाला त्या आधी चांगला माणूस होता यायला पाहिजे व इतर कला गुणदेखील तुमच्या अंगात असायला पाहिजे. हे संस्कार देणारे आमचे शिक्षक म्हणजे एकप्रकारे माझे आई वडीलच. आमच्या आई वडीलाने आम्हाला जन्म दिला असला तरी शिक्षकांनी मात्र समाजात जगायचं कसं,वावरायचं कसं,कसं बोलायचं याच शिक्षण दिलं आणि लहानपणीचं आमचा पाया पक्का केला. त्यामुळेच आज मी जेथे जॉब करतोय हे फक्त माझ्या गुरुनी मला जे संस्कार दिले त्या बळा मुळेच. 
     
आज ज्युनियर के.जी ते 12 पर्यंतचे शिक्षण भारदे शाळेत दिले जाते.आज शाळेचा विस्तार खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि ते वाढणे गरजेचंच होते. ग्रामीण भागात विद्यार्थांना सर्व सुविधा जवळ मिळावे हाच या विस्ताराचा उद्देश. प्रत्येक शाळेला दर वर्षी असलेला  सिलॅबस पुर्ण करावाच लागतो.ते सर्व शाळा पुर्ण करत देखील असतात.त्या व्यतिरिक्त कला,क्रिडा,साहित्य,नाटक,एनसीसी, वकृत्व, अभिनय, सामाजिक उपक्रम, अशा  सर्व प्रकारच्या मुलांच्या कलागुणांना वाव देणारे आणि त्या एक्टिविटीज मुलांकडून करुन घेणारे 70 शिक्षक व शिक्षिका या शाळेत आहेत. या शिक्षकांना फक्त डॉक्टर,वकील,शिक्षक,इजिनियर,घडवायचे नाहीत तर पत्रकार,कलाकार,व्यवसायीक,आणि  चांगला माणूस घडवायचें आहेतं. म्हणून या शिक्षकांची नेहमी धडपड चालू असते.फक्त मार्क चांगले पाडण्यापेक्षा एक चांगला नागरीक कसे घडवता य़ेईल याचा विचार करणार माझे शिक्षक व माझी शाळा आहे. राज्य व देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, साहित्य व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान या बाळासाहेब भारदे हायस्कूलने नेहमीच दिले आहे. प्रामाणिक आणि खरा निकाल, विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व विकसन आणि समाजभान जपणारी ही शाळा मला नेहमी मातृतुल्य वाटली फक्त मलाच नव्हे तर माझ्या सारख्या अनेकांना!
      
अशी माझी ही शाळा...पण काय भुर्रकन गेले ते दिवस शाळेचे, कळलंसुद्धा नाही!  आज शाळा सोडून 10 ते 12 वर्ष झाली. शाळा घराच्या जवळ असल्याने गावाकडे  गेलो तर शिक्षकांची नेहमी भेट होते. ज्ञानगंगेचे अविरत वहन करणारे हे शिलेदार,असेच काही शिलेदार दहा वर्षात मला भेटले. नव्या जगात जाण्याचे बळ मला त्यांनीच दिले. त्यामुळे त्यांना माझ्या हदयात नेहमी आदराचे स्थान आहे. एनसीसी मध्ये असताना रोज सकाळी उठून फिरायला जाण्याची शिंदे सरांनी लावलेली सवय आजही कायम आहे. आज एनसीसी मधील शिंदे सरांनी घडवलेले एनसीसी कॅडेंट दर वर्षी दिल्ली परेड साठी  2 ते 3 विद्याथी नेहमी निवडले जातात. ही शेवगावंक-यांच्या दृष्टीने अभिमानांची गोष्ट आहे. 

आज या शाळेने अनेक नामवंत अधिकारी देखील घडवले तर आहेच, पण प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेले विद्यार्थी,विद्यार्थीनी देखील घडवले आहेत.आयएएस डॉ.पुरुषोत्तम भापकर,आयपीएस तेजस्वी सातपुते, युवा कृषी संशोधक आदिनाथ काटे सीईओ,उत्तमराव करपे, एव्हरेस्टवीर अविनाश बावणे,पशुसंवर्धन आयुक्त डॉ.विवेक भारदे,माझे वर्गमित्र अलीम शेख, संतोष नेमाणे, सोमनाथ पिटेकर,मनोज गुजर, प्रदिप धनवडे, संदिप लांडगे, संदिप ठाकणे, जमीर पठाण, असे अनेक विद्यार्थीची नावे घेता येईल हे आज आपआपल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवताना दिसून येतात.  प्रत्येक क्षेत्रात आपला विद्यार्थी यशस्वी व्होवो म्हणून शिक्षक देखील त्या दृष्टीने स्व;ता ज्ञान मिळवताना दिसून येतात. उमेश घेवरीकर सर हे नेहमी नवनवीन गोष्टी करत आपला विद्यार्थी कसा पुढे जाईल यांचा विचार करत असतात. सरांनी  शॉर्ट फिल्म द्वारे शाळेच नाव पुर्ण महाराष्टात पोहचविले आहे.या शाळेचे विद्यार्थीच त्यांच्या शॉर्टफिल्मचे हिरो असतात! शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून संस्कार आणि शिक्षण देण्याची त्यांची कल्पना अफलातून आहे.असा उपक्रम करणारी हीशाळा राज्यातील बहुधा पहिली शाळा असेल! त्यांची कवितांची बाग पाहण्यासाठी राज्यभरातून नामवंत कवी साहित्यिक शाळेत येत असतात  गेल्या दहा वर्षापासून राज्य बाल नाट्य स्पर्धेत सहभागी होणारी नगरजिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे. नृत्य, बालनाट्य, द्वारे मुलांच्या कलागुणांना वाव देणारे असे शिक्षक आजकाल दुर्मीळ! 


     
अजून एक विशेष सांगायचं म्हणजे नोकरी धंद्यात जवळपास प्रत्येक आजूबाजूवाल्यांशी स्पर्धा करणारे आपण, वर्गमित्रांसोबत अगदी बरोबरीचे होऊन जातो. त्यांच्यात कधीच कोणी मोठा आणि लहान नसतो. हे मित्र कधी भेटले की सख्खे नातलग भेटल्याचा आनंद होतो. कधी एकमेकांची प्रशंसा करताना शब्द कमी पडू लागतात त्याचवेळी एकमेकांची गमतीने उणीदुणी काढताना कसली भीडही ठेवली जात नाही. हे फक्त शाळेतल्या मित्रांसोबत सहजशक्य असतं! शिक्षकांच्या अपार कष्टातून रुजवलेले शिक्षण क्षेत्रातील या रोपट्याचे आजी माजी विद्यार्थी, ऋषितुल्य अध्यापकांच्या शैक्षणिक द्रष्टेपणातून मोठ्या वटवृक्षात आज रुपांतर झाले आहे.याचा माजी विद्यार्थी म्हणून फार अभिमान तर आहेच परंतू आजच्या शाळा एज्युकेशन मॉल बनत असताना आपण थेट सानेगुरुजींच्या स्वप्नातील शाळेत शिकलोय म्हणजे किती भाग्यवान आहोत याचा आनंद आणि जबाबदारीची जाणीव देखील आहे! 
   
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लावते लळा की जसा माऊली बाळा...!!!