मुंबई : असं म्हणतात की, आयुष्यात कितीही श्रीमंती आली, कितीही गरिबी असली आयुष्यानं कितीही वळणं घेतली तरी एकदा वारीचा अनुभव घ्यावाच. घरदार, जमीनजुमला, पैसा अडका, आप्तेष्ट सर्वांनाच मागे ठेवत विठ्ठलाच्या भक्तीपोटी असंख्य पाय पंढरपुराच्या दिशेनं धाव घेतात.
विठुरायाला डोळा भरून पाहण्यासाठी सानथोर सगळेच ही पायवारी करत अखेर आपल्या देवाला डोळे भरून पाहता. तो क्षण पुरता भारावणारा असतो. हेच तर खरं सुख आहे, याचीच जाणीव त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असते.
वारी प्रत्येकालाच खुप काही देऊन जाते. इतकं, की आयुष्यभरासाठी काही क्षणांचा अनुभवही पुरेसा ठरतो. अशी ही आगळीवेगळी आणि खुप काही देऊन गेलेली वारी अनुभवली अभिनेता मिलिंद गवळी यानं. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्धच्या भूमिकेत दिसणारा मिलिंद 'विठ्ठल विठ्ठल' या चित्रपटाच्या निमित्तानं वारीत वावरला होता.
त्याच वेळचा एक अनुभव त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून वारीच्या बातम्या, तोंडावर येऊन ठेपलेली आषाढी एकादशी हे सर्व चित्र पाहता त्यानंही हा अनुभव शेअर केला. आपल्यामध्येही कोणालातरी विठ्ठल दिसतो ही भावना नेमकी काय असते हे त्यानं शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला जिथं तो चंद्रभागेच्या पाण्यात उतरतानाही दिसत आहे.
काय होता तो अनुभव?
मिलिंद एका साधुच्या वेशात पंढरपुरात बसला होता. चित्रीकरणाची सुरुवात होण्यास काही वेळ होता. तितक्यातच काही महिला त्याच्यापाशी आल्या. एका वयस्कर महिलेनं त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणाली “बाबा माझ्या आयुष्याचं सार्थक झालेलं आहे, दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, मुलगा रांकेला लागलेला आहे, आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या, म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन''.
त्यांचं बोलणं ऐकून, मिलिंदनं आपण कलाकार असून साधूच्या वेशात असल्याचं सांगितलं. त्यांना विठ्ठलापुढे नतमस्तक होण्यास सांगितलं. पण, त्याचं हे बोलणं ऐकूनही, “नाही बाळा, तूच मला आशीर्वाद दे ,कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'' असं म्हणाल्या आणि मिलिंदचे डोळे चमकले.
एकिकडे नकारात्मक भूमिकेत झळकत असल्यामुळे सध्या मिलिंद साकारत असलेल्या अनिरुद्धला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तर, काही वर्षींपूर्वी मात्र त्याच्यातच कोणालातरी विठ्ठलाचं रुप दिसलं होतं.... विचार करुनही अंगावर काटा येतोय ना?